प्रयोगांची रंगपुजा

येत्या ५ नोव्हेंबर २०२५ रोजी मराठी रंगभूमी दिवस साजरा केला जातो. मराठी साहित्यात प्रायोगिक रंगभूमी हा शब्दप्रयोग नेमका कुठून आला हे शोधणे जरी थोडे अवघड असले तरी १९६० च्या दरम्यान जेष्ठ नाटककार विजया मेहता, विजय तेंडुलकर, श्रीराम लागू, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर अरविंद देशपांडे अशा दिग्गजांनी, नामांकित संस्थांची निर्मिती केली ज्यातून अजरामर कलाकृती निर्माण झाल्या आणि तरुणपिढीची अख्खी फळी तयार होत गेली, आजही होतेय. यशापयशाचा फारसा विचार न करता त्यांनी एकांकिका आणि नाटकांचे प्रयोग सुरु केले. या पूर्वी सुद्धा ;अनेक नाटकं आणि प्रयोग होतेच परंतु या माध्यमाच्या कक्षा थोड्या व्यापक होत गेल्या ते १९६० नंतरच. रंगायन, कलोपासक, पी डी ए, छबिलदास, अविष्कार, इंडियन नॅशनल थिएटर, थिएटर ऍकेडमी अशा अनेक संस्था तेव्हा महाराष्ट्राच्या मातीत रुजू पाहत होत्या. या नाट्यसंस्थांच्या निर्मात्यांनी नव्या धाटणीची अभिव्यक्ती प्रस्थापित केली आणि नाटक या माध्यमाला नवा आशय दिला. या रंगकर्मींनी नवं, ताजं आणि प्रस्थापित कलाकृतींपेक्षा रंगभूमीला छेद देणारा काहीतरी जाणते-अजाणतेपणाने केलं म्हणून प्रायोगिक रंगभूमीचा जन्म झाला.

विशेष म्हणजे या दिग्गज कलावंतांनी चालू केलेली प्रायोगिक दिंडी आज तरुण पिढी अगदी उत्साहाने आणि अभिमानाने आपल्या खांद्यांवर पुढे नेत आहे. कलादर्शन पुणे याचे संस्थापक आणि नाट्य दिग्दर्शक विनोद रत्ना सांगतात, “आपल्या मराठी नाटकात इतकी ताकद आहे की प्रायोगिक नाटकं सुद्धा आपली अतिशय जोरात चालू आहेत. मुळातच प्रायोगिक नाटक म्हणजे जे थोडं वेगळ्या धाटणीच आहे, रोजच्या विषयांपेक्षा वेगळा काहीतरी विषय आहे , किंवा जो वेगळा पद्धतीने मांडलाय, जो लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. या नाटकाची प्रोसेस एका सेट नाटकापेक्षाही थोडी वेगळी असते किंबहुना दिग्दर्शक आणि कलाकार ती वेगळी करतात. आम्ही आमच्या नाटकांमध्ये थोडे बदल केले जे लोकांना आवडले आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही आमच्या नाटकात पुष्पवृष्टी केली, स्टेज वर गाड्या आणल्या आणि सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे एरवी प्रायोगिकला ज्या जागा मिळतात त्या पेक्षा ते मोठ्या थिएटरमध्ये आणून तिथे प्रयोग लावला. प्रायोगिक नाटकात एक गोष्ट खूप प्रामुख्याने जाणवते ते म्हणजे तुमचा विषय आणि कंटेन्ट जर ताकदीचा असेल तर लोक नक्की तुमची कलाकृती बघायला येतील.”

उच्छाद नाटकाचे लेखक निरंजन पेडणेकर सांगतात, “प्रायोगिक- हा घटक सगळ्यालाच लागू आहे; विषय, लेखन, रंगमंच, प्रॉपर्टी, सादरीकरण सगळ्याच अंगाने प्रायोगिक असू शकत. उच्छादचं सादरीकरण वेगळं आहे. प्रेक्षकांच्या समोर नाही तर दोन्ही बाजूने नाटक चालू असतं, ते तशा पद्धतीने प्रेक्षकांना बघावं लागत. आधीचं एक नाटक केलेलं त्या नाटकाचं नाव होतं ‘एक्झाइल’. हे नाटक पॅलेस्टिनी कवी महमूद दरविश यांच्या कवितांवर आधारित होतं. मी या नाटकासाठी कार वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या उतार असलेल्या फ्लॅट-बेड ट्रकचा वापर केला होता. त्यावर बसमधील प्रवासी बसलेले दाखवले होते, आणि त्या ट्रकचा उतार म्हणजे जणू कवीच्या कल्पनाशक्तीकडे जाणारा मार्ग होता. येत्या २ नोव्हेंबरला अंकुश अनचेन्ड हे सोलो नाटक येतंय. घटस्फोटित आणि नोकरीत पदावनत झालेला रंजन नावाचा एक पुरुष ऑनलाइन जगतात आधार शोधतो, पण तिथे त्याची ओळख अंकुश नावाच्या एका ‘पुरुष हक्क कार्यकर्त्या’च्या स्त्रीद्वेषी विचारसरणीशी होते. या काळ्या विनोदी एकपात्री नाटकात रंजनचा या विषारी विचारांच्या गर्तेत कसा प्रवास होतो, हे दाखवले आहे.
असे अनेक वेगवेगळे प्रयोग आम्ही केले आहेत. उच्छाद चे जवळपस ६०च्या वर प्रयोग झाले आहेत जे एका प्रायोगिक नाटकासाठी माईलस्टोन आहे. प्रायोगिक नाटक हे पूर्णपणे माऊथ पब्लिसिटीवर चालू राहणारी गोष्ट आहे. तरुण मुलांचा उत्साह आणि इच्छा तर भरपूर आहे, तसे प्रयोग होतायेत सुद्धा. एक नाटक आम्ही एका पार्किंगमध्ये सुद्धा सादर केलं होतं ज्याला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

लोकप्रिय नाट्य आणि सिनेअभिनेत्री विभावरी देशपांडे सांगतात,”जी कलाकृती सगळ्याच अर्थाने प्रयोगशील असते त्याला प्रायोगिक नाटक म्हणतात. प्रायोगिक नाटक बसवण्याची प्रोसेस ही प्रत्येक दिग्दर्शकाची वेगवेगळी असू शकते. काही दिग्दर्शक, सिद्ध असलेली संहिता हाती घेतात तेव्हा याबद्दलचं थोडं संशोधन, त्याचं वाचन, तालीम, अशा, प्रोसेसमध्ये ठरलेल्या गोष्टी होतात, कधी कधी जुनी संहिता, वेगळ्या पद्धतीने सादर केली जाते, त्याच रूपांतर होतं; आम्ही नाटक बसवतो तेव्हा बरेचदा आमच्याकडे संहिता नसतेच, प्रोसेसमध्ये जी लोक आहेत त्यांच्याशी बोलून, त्यांचं थोडाफार इम्प्रोव्हायझेशन करून आम्हाला कधी कधी व्यक्तिरेखा सापडतात, तालिमीतच नाटक लिहिले जाते; ‘जोयराइड’ नावाचं जर्मन नाटक आम्ही केलं तेव्हा ते पूर्णपणे नव्या पद्धतीने आम्ही सादर केलं. त्याचं लेखन, सादरीकरण, बसवणं, सगळंच प्रयोगशील पद्धतीने केलं. २०२६ मध्ये ग्रिप्सला ४० वर्ष पूर्ण होतील, या कालावधीत ग्रिप्सचे प्रयोगही खूप बदलले. अगदी पूर्वी, स्थापना झाली तेव्हा श्रीरंग गोडबोले यांनी, मूळ जर्मन २-३ नाटकं होती त्याचे मराठी रूपांतर केले, आता पूर्णपणे नवीन संहिता लिहील्या जातात. आशय, विषय, सादरीकरण सगळंच नवनिर्मित आणि प्रयोगशील पद्धतीने होतं. विशेषतः लहानमुलांसाठी नाटक करताना ते जास्त गांभीर्याने करावा लागत हे नक्कीच जाणवतं.

पुण्यात प्रायोगिक रंगभूमीची चळवळ मोठ्या प्रमाणात दिसून येते, कारण आता येथे नवनवीन थिएटर्स आणि प्रयोगांसाठी योग्य अशा जागा उपलब्ध झाल्या आहेत. अनेक तरुण नाट्यकर्मी स्वतःच्या संस्था स्थापन करून प्रायोगिक नाटकांची परंपरा पुढे नेत आहेत — जसे विनोद रत्ना यांचे ‘कलादर्शन’, अलोक राजवाडे आणि अनुपम बर्वे यांचा ‘राखाडी स्टुडिओ’. यासोबतच सुदर्शन रंगमंच, डॉ. श्रीराम लागू रंगावकाश, ज्योत्स्ना भोळे सभागृह, पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राचा ‘अंगणमंच’, भरत नाट्य मंदिर आणि नव्याने सुरू झालेले ‘द बॉक्स’ यांसारख्या मंचांवरही एकाच वेळी अनेक प्रायोगिक नाट्यकृती सादर होत असतात.
मुंबईतही अंधेरीतील ‘रंगशाला’, ‘पृथ्वी थिएटर’, नव्याने सुरू झालेले ‘एनएमएसीसी’मधील दोन लहान थिएटर्स, तसेच ‘अविष्कार’सारख्या संस्था काही शाळांमधून प्रायोगिक नाटके सातत्याने सुरू ठेवत आहे.

तरुणांच्या सहभागाबद्दल विभावरी सांगतात,” तरुण मुलं या क्षेत्रात प्रचंड सक्रिय आहेत. पुण्यात याचा प्रभाव जास्त जाणवतो कारण पुण्यात खूप जागा झाल्या आहेत जिथे अतिशय प्रभावी आणि नवीन प्रयोग नाटकात होत असतात. आत्ताची जी तरुण पिढी आहे त्यांना दृकश्राव्य माध्यम जास्त परिचयाचं असल्याने त्यांचे प्रयोग त्या पद्धतीचे असतात, हा बदल सुद्धा खूप नैसर्गिक पद्धतीने झाला आहे, त्यांचे प्रयत्न, कष्ट आणि नवीन काहीतरी करून बघण्याचा उत्साह खूपच आश्वासक वाटतो.”
निरंजन सांगतात, “माझ्या ग्रुपमध्ये बऱ्यापैकी तरुण मुलचं काम करतात. त्यांना अर्थातच यात रस आहे पण शेवटी यातून जास्त अर्थार्जन होत नाही त्यामुळे या सोबत त्यांच्याकडे सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत जे ते अजमावून बघतात. पण या क्षेत्रात काम करण्याचा उत्साह नक्कीच दिसतो.”

प्रायोगिक रंगभूमी पूर्णतः माऊथ पब्लिसिटी वर अवंलबून आहे. सध्या सोशल मीडिया हे उत्तम माध्यम उपलब्ध झाले आहे. प्रायोगिकचा प्रेक्षक वर्गही थोडा व्यापक विचारशक्तीचा असतो. हे अशा अर्थाने की जे समोर आहे ते आकलन करून घेणारा असावा लागतो. म्हणूनच प्रेक्षकांचा प्रतिसाद, आर्थिक बांधणी, आर्थिक पाठबळ अशी काही आव्हानं प्रायोगिक रंगभूमीची पाठ धरून आहेत हे अमान्य करून चालणार नाही यावर विभावरी सांगतात, “प्रायोगिक रंगभूमीचे प्राधान्य अर्थार्जन नसले तरीही आर्थिक गणितं चांगल्या पद्धतीने बांधणे अत्यावश्यक आहे. नाटकात काम करणारे कलाकार समोर स्टेजवर दिसतात त्यामुळे पैसे नाही मिळाले तरी त्यांना एक समाधान लगेच मिळत; परंतु बॅकस्टेजच्या लोकांना आपल्या कामाची काहीतरी पोचपावती मिळणं गरजेचं आहे. तसेच हल्लीची मुलं खूप कष्ट करून आणि कधी कधी लांबून प्रवास करून अगदी उत्साहाने प्रायोगिक नाटकात काम करतात, निदान त्यांना पेट्रोलचा, प्रवासाचा खर्च तरी मिळावा; प्रेक्षकांनी (तिकीटदर आणि प्रतिसादाच्या बाबतीत) आणि निर्मात्यांनी सुद्धा हा आर्थिक गणिताचा मुद्दा विचारात घ्यायला हवा.”
यालाच दुजोरा देत निरंजननेही सांगितले, ” प्रायोगिकमध्ये प्रयोग चालू राहणं महत्त्वाच आहे पण फक्त १०- १५ लोकांत ते करता येत नाहीत. प्रयोगातून नफा होणं अपेक्षित नसतंच पण किमान प्रयोग लावता येईल अशी प्रेक्षक संख्या आणि तेवढे प्रयोग होणं हे पण आव्हानात्मक आहे.

विनोद रत्ना ह्यांनी जरा जमेची बाजू घेत सांगितले “आर्थिक पाठबळ हा मुद्दा थोडा चिंताजनक आहेच पण सध्या एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे एकांकिका स्पर्धा बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात होतायेत, त्यांच्या बक्षिसांच्या रक्कमही चांगल्या असतात आणि त्याचे परीक्षकही मोठे कलाकार असतात. चांगल्या एकांकिकांना, चांगलं व्यासपीठ मिळत आणि कोणीतरी चांगला निर्माता सुद्धा मिळतो. पण ही प्रक्रिया तशी हळू हळू असते, मुलांना तेवढा वेळ देणं नेहमीच शक्य होत नाही, तसेच नुसतं स्पर्धेत असून उपयोग नाही, जिंकणंही महत्त्वाचं आहे.”

मराठी रंगभूमी आणि मराठी नाटके ही सनातन काळापासून चालू असलेली अजरामर चळवळ आहे. सतत न थकता आणि कष्ट करून आनंदाने नाटक करणाऱ्यांची ही रंगभूमी आहे. आधी सांगितलेल्या सगळ्या दिग्गज कलावंतांसोबत आता मोहित टाकळकर, अतुल पेठे, तसेच नव्य पिढीचे अलोक राजवाडे, अनुपम बर्वे, सुरज पारसनीस, निरंजन पेडणेकर, विनोद रत्ना, अजित साबळे ही सगळी मंडळी नवीन प्रयोग करत असतात. मराठी रंगभूमी म्हणजे केवळ मंचावरच्या प्रयोगांचा प्रवास नाही, तर तो विचारांचा, दृष्टिकोनांचा आणि सामाजिक जबाबदारीचा शोध आहे. बदलत्या काळातही मराठी रंगभूमीचं सार एकच राहिलंय — प्रश्न विचारण्याचं, जाणिवा जागृत करण्याचं आणि प्रेक्षकांशी जिवंत संवाद साधण्याचं. आणि हीच आपल्या रंगभूमीची खरी ताकद आहे.

Vaishnavi Vaidya
Vaishnavi Vaidya
Articles: 33

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *