नव्याकोऱ्या चोळीचा साज

एव्हाना घरांमध्ये साफसफाई, सामानांची यादी, डेकोरेशन, रांगोळ्या, नवीन कपडे, साड्या, दागिने या सगळ्याची लगबग सुरु झाली नसेल तर नवलच. दिवाळी हा सण सर्वांगानेच किती परिपूर्ण आणि दिमाखदार आहे! खायची, नटायची, मज्जा करायची, सजावट करायची सगळीच हौस या एका सणात मनसोक्त करता येते. वर्षाअखेरच्या सुट्ट्या, हळूहळू पडणारी थंडी, घरात गोड आणि चमचमीत फराळाचा सुगंध, उटण्याचा दरवळ, कंदील-पणत्यांची आरास हे सगळंच चित्र हळूहळू मनात यायला लागतं आणि मग या वर्षी काय बरं खास करता येईल ही चक्रसुद्धा डोक्यात फिरायला लागतात. दरवर्षीच्या तयारीत हमखास तरुणाईच्या टू—डू लिस्टमध्ये असणारा मुद्दा म्हणजे ४—५ दिवसात काय आणि कोणते कपडे घालायचे? आपली दिवाळीतील कपड्यांची फॅशन आधुनिक आणि पारंपरिक दोन्हींचा मेळ घालणारी असावी यासाठी तरुणाई ट्रेण्डसवर भर देत असते. तरुणींसाठी घागरा, भरजरी ड्रेस, साड्या या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण सध्याचा नवीन ट्रेण्ड आहे तो म्हणजे रेडीमेड आणि सुपर फॅशनेबल ब्लाऊजचा!

साडीमधला ब्लाऊज पीस काढून त्याचे छानसे ब्लाऊज शिवून घेणे ही पद्धत रुढ आहेच, पण त्याबरोबरच अनेकींना साडीला कॉन्ट्रास्ट आणि हटके दिसेल अशा रेडीमेड ब्लाऊजची सुद्धा भुरळ पडते. ब्लाऊजची शिलाई आणि रेडीमेड ब्लाऊजच्या किमतीत फारसा फरक नसतोच, त्यामुळे कधी कधी इमर्जन्सी असते किंवा कधी कधी साडीतलेच ब्लाऊज शिवायचा कंटाळाही येतो तेव्हा हे रेडीमेड ब्लाउजचे पर्याय परफेक्ट आहेत. साडीचा लूक खऱ्याअर्थाने खुलून दिसतो तो ब्लाऊजमुळे… म्हणूनच हल्ली बाजारात सुद्धा अनेक अप्रतिम आणि वेगवेगळ्या डिझाइनचे ब्लाऊज आले आहेत.

बोट नेक, डीप नेक, ऑफ-शोल्डर, जॅकेट स्टाईल ब्लाऊज, स्लीव्हलेस ब्लाऊज, कॉलर नेक, खणाचा ब्लाऊज, एम्ब्रॉयडरी ब्लाऊज असे वेगवेगळे प्रकार सध्या ट्रेण्डमध्ये आहेत.

बोट नेक ब्लाऊज

हा प्रकार हल्ली-हल्लीच ट्रेण्डमध्ये आला आहे. नावाप्रमाणे याचा पुढचा गळा बोट सारखा अर्ध गोलाकार असतो. छोट्या बॉर्डरच्या साड्यांना हा प्रकार फार छान दिसतो. असा ब्लाउज घेतला किंवा शिवला तर तो मेगा स्लीव्हज असलेला घेऊ नका, जरासे मोठे हात या प्रकारच्या ब्लाऊजला छान दिसतात. मागे तुम्हाला हवे तसे पॅटर्न, नॉट सुद्धा लावून मिळू शकते. काठपदर सोडून साध्या साड्यांना किंवा पार्टीवेअर साड्यांनासुद्धा हा प्रकार चांगला दिसतो. ब्रोकेड किंवा एम्ब्रॉयडरी किंवा पूर्ण जरीच्या कापडात असेल तर हे ब्लाऊज जास्त उठून दिसतात.

स्लीव्हलेस ब्लाऊज

वर्किंग वूमेनचा हा आवडता प्रकार आहे. हल्ली स्लीव्हलेस ब्लाऊज कुठल्याही पद्धतीत आणि प्रकारात मिळतात, त्यामुळे अगदी पैठणी किंवा बनारसी साड्यांपासून ते कॉटन साड्यांपर्यंत कुठल्याही साडीवर स्लीव्हलेस ब्लाऊज घालता येऊ शकतो. पैठणी किंवा भरजरी साड्यांवर जरा डिसेंट डिझाईनचा ब्लाऊज चांगला दिसतो. तसंच प्लेन किंवा साध्या साड्यांवर थोडा भरजरी ब्लाऊज छान दिसेल. हल्ली सिक्किन साड्यांचा प्रकार फार प्रचलित आहे, त्यामध्ये स्लीव्हलेस ब्लाऊज अतिशय सुंदर दिसेल.

बलून हाताचे ब्लाऊज

आधी म्हटलं तसं सध्या तरुणांना जुन्या आणि नवीन परंपरांची सांगड घालायला नेहमी आवडते. त्यातलाच एक प्रकार म्हणजे बलून हाताचे ब्लाऊज. पूर्वीच्या सिनेमांमध्ये ही स्टाईल फार प्रचलित होती, आता पुन्हा मुलींना ही स्टाईल हवीहवीशी वाटू लागली आहे. शिवून किंवा रेडीमेड कशाही प्रकारात असे ब्लाऊज मिळतील. पार्टीवेअर आणि डिझायनर साड्यांवर अशा पद्धतीचे ब्लाऊज जास्त उठून दिसतात. दिवाळी पार्टीसारख्या समारंभांसाठी हा प्रकार अगदी परफेक्ट आहे. नेट सारख्या कापडांमध्ये सुद्धा आता असे ब्लाऊज मिळतात तेही छान दिसतात.

पेपलम ब्लाऊज

हा सगळ्यात नवीन प्रकार आहे. खरंतर, हा तुमच्या लेहेंग्यावरचा ब्लाऊज किंवा टॉपच असतो पण तोही तुम्ही एखाद्या डिसेंट साडीवर अगदी स्टायलिश पद्धतीने घालू शकता. हा ट्रेण्ड सेलेब्रिटीजमुळे जास्त लोकप्रिय झाला आहे. असं स्टायलिंग केल्यावर इंडो-वेस्टर्न फ्युजन पद्धतीत तुमचा पेहराव दिसतो. नेहमीच पद्धतीची साडी नेसून कंटाळा आला असेल तर हा प्रकार अतिशय युनिक आहे.

कॉलर ब्लाऊज

थोडा इंडो-वेस्टर्न स्टायलिंगमध्ये हा एक प्रकार सुद्धा ट्रेण्डिंग आहे. कुर्त्याला जशी स्टॅण्डिंग कॉलर असते, तशाच पद्धतीचा पॅटर्न या ब्लाऊजमध्ये असतो. या मध्ये तुम्ही स्लीव्हलेस किंवा थोडे मोठ्या हाताचे असे आपल्या आवडीप्रमाणे स्टाईल निवडू शकता. शक्यतो फॉर्मल किंवा अगदी प्लेन साध्या साड्यांवर हे ब्लाऊज चांगले दिसतात. हे ब्लाऊज शक्यतो प्लेन सिंगल कलरमध्ये मिळतात, तुम्हाला हवे तसे पॅटर्न यामध्ये शिवून जास्त चांगले मिळतात.

रफल ब्लाऊज

आजकाल हजारो प्रकारच्या वेगवेगळ्या डिझायनर साड्या मिळतात, त्याही पलिकडे जाऊन रेडीमेड साड्या सुद्धा मिळायला लागल्या आहेत. अशा साड्यांवर फ्रिलचे ब्लाऊज फार छान दिसतात. सध्याच्या ट्रेण्डी प्रकारात त्याला रफल ब्लाऊज म्हणतात. सेलेब्रिटीजमुळे हे असे प्रकार इतके नावारूपाला आलेत की आपण म्हणू त्या स्टाईलचे कपडे सध्या बाजारात यायला लागले आहेत. पार्टी कॅटेगरीच्या आऊटफिटसाठी तुम्ही हा प्रकार नक्कीच स्टाईल करून बघा, इतरांपेक्षा सगळ्यात जास्त युनिक दिसाल. हे ब्लाऊज प्रिन्सेस पॅटर्नमध्ये असतात आणि अगदी फ्रीसाईझ मध्येही बाजारात मिळतात.

खणाचे ब्लाऊज

खणाचे कपडे मागच्या काही वर्षात इतके लोकप्रिय झाले की प्रत्येक स्टायलिंगमध्ये, सणावाराच्या शॉपिंगमध्ये, प्रत्येक समारंभात खण अगदी उठून दिसू लागला. तुम्ही जर साडी शौकीन असाल आणि अगदी छोट्या छोट्या समारंभाला सुद्धा साड्या नेसायला आवडत असतील, तर एखादा तरी खणाचा ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच हवा. आजकाल मिक्स-मॅच पद्धत असल्यामुळे एखादा छानसा लाल किंवा हिरवा खणाचा ब्लाउज असेल तर तो अगदी कॉटनपासून ते हलक्या सिल्कच्या साडीपर्यंत सुद्धा घातलेला चालू शकतो. आता खणाच्या ब्लाऊजमध्ये सुद्धा इतके असंख्य प्रकार, प्रिंट आणि पॅटर्न आहेत की हे घेऊ की ते असं होतं.

चिकनकारी ब्लाऊज

शक्यतो सफेद, ऑफ-व्हाईट, प्लेन ब्लॅक किंवा कुठलयही प्लेन सिंगल कलरमध्ये चिकनकारी ब्लाऊज अतिशय छान दिसतात. मूळ कॉटन, सॉफ्ट कॉटन, कॉटन सिल्क, लिनन अशा साड्यांवर डोळे झाकून चिकनकारी ब्लाऊज घेऊन टाका. सध्या हॅन्ड-पेंटेड आणि प्राजक्ताच्या फुलांची एम्ब्रॉयडरी असलेल्या मूळ कॉटनच्या साड्या फार लोकप्रिय झाल्यात, अशा साड्यांवर सफेद चिकनकारी ब्लाऊज फारच उठून दिसतो. ऑफिसमधल्या दिवाळी सेलिब्रेशनसाठीही कॉटन साडी आणि चिकनकारी ब्लाऊज परफेक्ट आहे.

पैठणी ब्लाऊज

आजकाल पैठणी हा प्रकार फक्त साडीवर न राहता इतर कपड्यांमध्ये सुद्धा आला आहे आणि तो कमालीचा सुंदर दिसतो. पैठणीचे काठ, डिझाईन असलेले असंख्य ब्लाऊज बाजारात आले आहेत, तुमचं थोडंसं जास्तीचं बजेट असेल तर हा ब्लाऊज तुमचा कपाटात अगदी नक्की असायला हवा. जगातल्या कुठल्याही पद्धतीच्या जरीच्या साडीवर तुम्ही हा ब्लाऊज मॅच करू शकता. पैठणीचे क्रॉपटॉप सुद्धा हल्ली मिळतात तेही तुम्ही लेहेंगा किंवा साडीवर ब्लाऊज म्हणून वापरू शकता.

सिल्क, कॉटन, जरी आणि जरा फॅन्सी नेट सारख्या ४—५ प्रकारातील ब्लाऊज घेतले तर तुम्ही तुमचं पूर्ण साडीचं वॉर्डरोब अगदी क्लासी बनवू शकता. आता सणवार सोडून इतर वेळी सुद्धा रेडीमेड ब्लाऊज आजकाल परवडतात, तर कोणते ब्लाऊज तुमच्या कडे असायलाच हवे याचे थोडक्यात काही प्रकार वर सांगितले, तसाच पांढरा, काळा, लाल, मस्टर्ड, गोल्डन, छान गारेगार हिरवा या ४-५ रंगांचे ब्लाऊज तुमच्याकडे असतील तर तुम्ही वाटेल ते कॉम्बिनेशन आणि फॅशन करू शकता. गोल्डन, लाल, हिरवा अशा पद्धतीच्या रंगामध्ये कुठल्याही काठपदराच्या किंवा सिल्कच्या साड्या उठून दिसतात. अजरख प्रकार सुद्धा फार प्रचलित झालाय, त्याचं फॅब्रिक आणि प्रिंट फारच ट्रेण्डी आणि मिनिमलिस्टिक वाटतात, त्या साड्यांवर तुम्ही कॉटन प्रिंटेड जे ब्लाउज असतात ते डोळे झाकून वापरू शकता, त्यात अर्थातच मिक्स-मॅच कॉम्बिनेशन केलेत तर उठून दिसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish