काळाचा वेध घेणारा दंशकाल

गुढकथांचा विषय निर्विवादपणे वळतो तो रत्नाकर मतकरी आणि नारायण धारपांच्या लेखनाकडे. या लेखनाचं किंबहुना लेखकांचं वैशिष्ट्य म्हणजे, हे साहित्य वाचत असताना एक प्रकारचं वलय आपल्या सभोवताली निर्माण होतं आणि नकळत आपण त्या कथानकातलं पात्र होऊन जातो. ती गोष्ट आपलीच आहे किंवा आपल्याच भोवती घडत आहे असं जाणवून देणारा अदृश्य घटक आपल्याच कल्पनाशक्तीतून निर्माण होतो. माणसाचे अंतर्मन फार चमत्कारिक असते. त्याचे गुढ आजतागायत कोणाला उलगडलेले नाही. तिथेच तर भिती, रहस्य या सगळ्यांचे मुळ दडलेले असते.

याच धर्तीवर आपल्या गुढ कथांचे चित्र मनाच्या अंतररूपी कॅनव्हासवर चितारणारे आजच्या पिढीचे लेखक हृषीकेश गुप्ते. त्यांची राजहंस प्रकाशन ने प्रकाशित केलेली कादंबरी ‘दंशकाल’ ही याच आशयाची आहे. कोकणातल्या घरंदाज देशमुख परिवाराची कहाणी. या कादंबरीचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी मनोवेधक केलं आहे. एक प्रचंड खोल विहीरीतून खाली जाणारा दोरखंड, त्याला लटकत असलेला लामणा, त्याच्या आधारे वर येणारी माणसं आणि त्याच्या तळाशी दडून बसलेला भयंकर प्राणी!

हे त्या कादंबरीचे चित्रदर्शी वर्णन. कादंबरीचे नाव आणि मुखपृष्ठावरून त्याच्या गुढत्वाचा अंदाज वाचकाला येतो. याच कुहूलतेने आपण पानं उलटतो आणि या कालचक्रात अडकतो.
या कथेतला नायक तुम्हा-आम्हांसारखा सर्वसाधारण मुलगा आहे. ‘अनिरुद्ध!’. तो, स्वत:ची, त्याच्या घरातल्यांची, भुगावांत कोण्याएकेकाळी प्रतिष्ठीत असणाऱ्या देशमुख वाड्याची कथा सांगतोय. कथेतील काळानुरूप घडणाऱ्या विचित्र घटना आणि घरातल्यांसकट प्रशस्त अशा देशमुख वाड्याची क्रमश: होत जाणारी वाताहात अस्वस्थ करते. अनिरूद्ध उर्फ नानु हा देशमुखांचा वारस आणि सध्याचा मानसोपचारतज्ञ.

ही कादंबरी प्रथमपुरूषी लिहीली आहे त्यामुळे सुरूवातीच्या प्रत्येक घटनेत वर्णन केलेला गच्च काळोख हा सुद्धा त्यातील एक पात्रच बनून जातो. नायकाच्या बालपणापासून अगदी प्रौढ वयापर्यंतच्या कालखंडातील प्रत्येक व्यक्ती, वास्तू, प्रसंग एका गडद गुंत्यात अडकले आहेत. या कथेची सुरूवात अशाच एका विचित्र घटनेनी होते. हीच जणू त्या रहस्यमय कालचक्राची सुरूवात ठरते. लेखनाचा आशय भय अथवा गुढतेचा असला तरी कादंबरीची कथा वेगवेगळ्या घटनांतून जणू नऊ रसंच आपल्या समोर आणते. हेच या कादंबरीचे वेगळेपण आहे. यातील पात्रांची ओळख सुद्धा घडणाऱ्या घटनांमधूनच होते.
ही कथा वर्तमानकाळावर असली तरी एखाद्या वास्तू, वस्तू किंवा व्यक्तीबद्दल भूतकाळातील संदर्भ, आठवणी अनेक ठिकाणी डोकावतात. कथेत वावरणाऱ्या व्यक्तींसोबतच काही अनामिक, गुढ पात्रांरूपी शक्ती अर्थातच आहेत. फक्त काळोखात जाणवणाऱ्या आणि वावरणाऱ्या या शक्तींचे वर्णन अतिशय वास्तववादी वाटते. ‘रात्रीच्या काळोखात घरातल्या भिंतींना सुद्धा जीव येतो आणि त्या जणू सूक्ष्म हालचाल करत असतात’, याच कल्पनेतून जन्माला आलेलं कथेतलं अनामिक रहस्याचं दर्शन लेखकाने वाचकांना घडवलं आहे.

माणूस म्हटलं की भय, क्रोध, लोभ, मैथून अशा अनेक बिभत्स भावना सुद्धा मनात घर करून असतात. कथेतही वेगवेगळ्या पातळीवर या अगदी उघडपणे मांडल्या आहेत, कदाचित हाच घटक वाचकाला कथेशी घट्ट जोडून ठेवतो. अफाट कल्पनाशक्ती आणि समृद्ध शब्दसंपदेचा वापर या केंद्रबिंदुंमुळे यातील प्रत्येक घटना ज्या तीव्रतेने वाचकाला उमजायला हवी तशीच उमजते. मुख्य म्हणजे कथेतील प्रत्येक घटनेचा फक्त विचार लेखकाने मांडला असुन, निष्कर्ष वाचकावर सोडला आहे. मग ती नायकाच्या आईच्या मृत्युची घटना असो, भानुकाकाचे वेडेपण असो, अण्णा आणि रेवा काकुचे अनैतिक संबंध असो किंवा घरात वावरणारी ती अनामिक शक्ती असो.

भरल्या, नांदत्या घराचा अक्षरक्ष: आपल्या समोर झालेला अंत जितका नायकाला भेडसावून टाकणारा आहे तितकाच वाचकालाही अचंबित करणारा आहे. या कथेतील सगळीच माणसं, नानू (नायक), अनू (नायकाची बायको), आई, अण्णा, भानूकाका, काकू, नंदाकाका, आजी आणि इतर सहाय्यक पात्र या सगळ्यांनाच अनेक शेड्स आहेत. म्हणूनच ती खरीखुरी वाटतात. अनिरूद्ध हा स्वत: एक प्रतिथयश मानसोपचार तज्ञ आहे. जेव्हा आपल्याच माणसांबद्दल इतक्या चक्रावून टाकणाऱ्या गोष्टी समजतात तेव्हा निश्चितच सगळ्या भावनांचा कल्लोळ अंतरंगी दाटून येतो आणि त्याचं परिमाण करणं अवघड होतं. असचं काहीसं अनिरूद्धचं या कथेत होतं. त्याची दुसरी बाजू म्हणजे, तो मानसोपचारतज्ञ आहे म्हणूनच कदाचित प्रत्येक घटनेचं विश्लेषण करून त्याच्या अधिकाधिक खोलात जाणं हे तत्व कथेत दिसून येतं. अनिरूद्ध उच्च शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी शहरात येतो पण या विळख्यात तो नकळत अडकलेला असतो, विविध कारणांनी या घटनांशी त्याचा संबंध येत असतो. काळानुरूप त्याचा डोंबिवलीत प्रशस्त बंगला होतो आणि देशमुखांची उरली सुरली मंडळी तिथे स्थाईक होतात. हा बंगला अगदी भुगावच्या वाड्यासारखा हवा असा अनूचा आग्रह तो समजून घेतो आणि पुन्हा जुन्या घटनांचा मागोवा घेतो.

भानुकाकाला लागलेल्या वेडाचा फायदा घेऊन देव-धर्माचा बाजार, अपत्यप्राप्तीच्या माफक अपेक्षेने मठात येणाऱ्या स्रिया व त्यांच्या सोबत होणारे गैरव्यवहार, भानुकाकाच्या अंगात येणाऱ्या दोन व्यक्ती या घटना वाचताना वास्तवाचा भास होतो. या सगळ्या प्रसंगांच्या पार्श्वभूमीवर शेवटी एक भकास शांतता लेखक दर्शवतो पण ती सुद्धा मृगजळासारखी वाटते. त्यातुनही अनपेक्षित वळणं समोर येतात. कौटुंबिक नाट्यात वावरणारी ही कादंबरी अचानक नैतिक-अनैतिक, सामाजिक पेच गुंतवते आणि सोडवते सुद्धा! त्याची शैली सुद्धा आपल्या नकळत रेखाटली आहे.

कादंबरीतील प्रत्येक स्त्रीपात्र विलक्षण आहेत. प्रत्येक घटनेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे एकीचा संबंध असतो. यातल्या आईशी नायक अर्थातच जास्त जवळ असतो. आईच्या अनेक छटा, तिचे घरातले स्थान, घरातल्यांशी संबंध, आण्णा गेल्यावर तिच्यात होणारे असामान्य बदल हे बारकाईने मांडले आहेत. आईचा मृत्यु या घटनेचा नायकाच्या आयुष्यावर बराच परिणाम होतो. त्या घटनेचा ऊहापोहा नायकाच्या मनात शेवटपर्यंत असतो. आधी जिला घरात असामान्य असे महत्त्व नव्हते पण नंतर तिच्याच भोवती अनेक घटनांचे गारूढ होते अशी नायकाची काकू. सुरुवातीला स्वत:च्या रूपाचा असणारा गर्व, शरीराची भुक भागविण्यासाठी घडलेले प्रसंग, अपत्यशोकामुळे बदललेले आयुष्य आणि काळानुरूप आलेले शहाणपण या अनेक घटनांमधून काकू वेगवेगळ्यारूपात आपल्या समोर येते. शेवटी नायकाच्याच मनात अचानक घर करणारी काकूबद्दलची लालसा ही पुन्हा नैतिक-अनैतिकतेच्या विळख्यात वाचकांना अडकवते. मठाच्या गैरप्रकारांमुळे भानुकाकाची पसरलेली महती आणि मिळणारा पैसा याला आजीचा दुजोरा, पण नंतर आपल्याच डोळ्यासमोर एक एक करून तीनही मुलांची कार्य पाहिलेली आजी! असं रंगवलेलं आजीचं व्यक्तिमत्त्व सुद्धा विसरता येत नाही. स्वतंत्र विचारांच्या मुशीत वाढलेली अनु या सगळ्या प्रसंगांचा तर्कसंगतीने आकलन करते, अनेक प्रसंग तिला माहितही नसतात. पण तिचं पात्र हे अत्यंत खंबीर स्रीपात्र आहे. पैशाच्या आमिषाला बळी पडलेल्या आत्यावर सुद्धा अनेक संकटं येतात पण ते पात्र फार प्रकाशझोतात आणलेलं नाही.

कथेचा नायक काही अंशी दुबळा, मोहाला बळी पडणारा आहे. कित्येकदा काही घटना यामुळेच घडल्या आहेत. पण तो देशमुखांचा वंश आहे, वंशाला वाचवणारा एकमेव आधार आहे, मुख्य म्हणजे एक यशस्वी मानसोपचारतज्ञ आहे. या गोष्टी त्याला हे सत्य मान्य करू देत नाहीत. मधल्या काही भागात विषय आखूड होतात आणि कथा खेचली जाते असे वाटते पण एखादं अनपेक्षित वळणं येतं आणि पुन्हा आपण त्यात गुंतून जातो. काही घटनांचं वर्णन करणारी भाषा अक्षरक्ष: कानातून रक्त येईल अशी आहे पण या दंशकालात आपणही नकळत अडकलेले असतो, आपल्याला अर्धवट सोडणे अशक्य असते.
अशा अनेक पातळीवर ही कादंबरी वाचकांना काबीज करते.

हृषीकेश गुप्ते हे नाव तरूण वाचकांमध्ये मुख्यत: कोकणातून इतरत्र स्थाईक झालेल्या तरूण वाचकांमध्ये लोकप्रिय आहे. दंशकाल सोबतच त्यांची चौरंग कादंबरी आणि घनगर्द कथासंग्रह आहे. नुकतीच रोहन प्रकाशनकडून हाकामारी, काळजुगारी या लघुकादंबरी, परफेक्टची बाई आणि फोल्डिंगचा पुरूष या दोन अनोख्या दीर्घकथा प्रकाशित झाल्या आहेत. आतापर्यंत अशा आशयाचे लेखन, वाचन मतकरी, धारप इथपर्यंतच सिमीत होते पण यासोबतच हृषीकेश गुप्ते यांच्या लेखणीची स्वतंत्र शैली वाचकांना नक्की भावेल यात शंकाच नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish