
आजचा दिवस हा ‘जागतिक कुटुंब दिवस’ म्हणून जगभर साजरा केला जातो. भारतीय परंपरेत कुटुंबसंस्थेला खूप महत्त्व आहे. मुळात भारतीय संस्कृतीच ही कुटुंबवत्सल संस्कृती आहे. जगभरात पाश्चात्यकरणाचे वारे वाहू लागले आणि विभक्त कुटुंब पद्धत उदयाला आली. या पार्श्वभूमीवर भारतात आजही एकत्र कुटुंब पद्धत बहुतांश परिवारात पाहायला मिळते. अजून नाविन्यपूर्ण कुटुंबाची कल्पना म्हणजे ‘विस्तारित कुटुंब’ किंवा ‘एक्सटेंडेड फॅमिली’. भारतात रक्ताच्या नात्यांना जितके महत्त्व आहे तितकेच भावनिक नात्यांनाही. हे विस्तारित कुटुंब म्हणजेच आपले जिवलग मित्र-मैत्रिणी, स्नेही… ज्यांचा खरंतरं आपल्याशी परस्पर संबंध नाही पण तरीही परिवारातलाच एक भाग असल्यासारखे हे जिवलग… भारतीय लोक आपल्या मुळाशी किती घट्ट जोडले आहेत हे सांगणारी ही कुटुंबवत्सल संस्कृती.
सध्या संयमाची परिक्षा पाहणाऱ्या या काळात आपल्या परिवारात, आपल्या माणसांत असणं खूप दिलासादायक आहे. एरवी आपल्या रुटीनमध्ये व्यस्त असणाऱ्या तरूणाईला या परिस्थितीत योगायोगानेच हे दिवस परिवारासोबत राहायला मिळत आहेत.
हा लाॅकडाऊनचा काळ तरूणाईसाठी बहुविधप्रकारे ‘अनुभवी’ आहे. जे अगदी वर्कोहोलिक आहेत त्यांना हा शिक्षेसारखा तर ज्यांना स्वतः मध्येच रमायला आवडतं त्यांच्यासाठी पर्वणी आहे. पण सध्या लॅाकडाऊनने ‘वर्क फ्राॅम होम’ सोबतच ‘वर्क फाॅर होम’ चा सुद्धा ट्रेंण्ड आणला असं म्हणायला काहीच हरकत नाही. पदरी पडलेल्या सुट्टीत तरूणाई अगदी आवडीने, मागे पडलेल्या, रखडलेल्या, शिकायचे राहून गेलेल्या घरकामांमध्ये रमताना दिसते. घरात राहून कंटाळा आल्यावर योग्य पद्धतीत वेळ जाणारी जागा म्हणजे ‘स्वयंपाक घर’. रोज व्हाॅट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबूक स्टोरीजवर चमचमीत, पदार्थांचा आपल्याला पुर आलेला दिसतो. या निमित्ताने बॅचलर मुलं-मुली स्वयंपाक शिकताना दिसत आहेत. अनेक तरूण मुलं मुली आता आपली जेवण बनवायची आवड जोपासत आहे. घरातली साफसफाई हा नेहमीच एक यक्ष प्रश्न असतो. हे काम सुद्धा तरूणाई अगदी आवडीने करत आहे. या निमित्ताने जुने फोटो अल्बम काढून जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि तेवढ्यापुरते का होईना मन प्रसन्न होते असे काही तरूणांचे म्हणणे आहे.
स्वयंपाकासोबतच नव्याने समोर आलेली गोष्ट म्हणजे ‘व्हर्चुअल फॅमिली गेट टुगेदर्स’. सगळ्यांनाच ही बंधनकारक सुट्टी पाळावी लागतेय मात्र कोणी कोणाला भेटू शकत नाही. म्हणून गुगल ड्युओ, स्काईप, झूम, हॅंगआऊट्स, व्हाॅट्सअप अशा सोशल माध्यमातुन फॅमिली व्हिडिओ काॅल्स होताना दिसत आहेत. डोंबिवलीचा अविनाश देशपांडे सांगतो, “सध्या लाॅकडाऊनमुळे सगळेच घरात आहेत. आम्ही गंमत म्हणून वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन व्हाॅट्सअपच्या फॅमिली ग्रुपवर करत असतो. खाद्यस्पर्धेचं आयोजन केलं होतं तेव्हा प्रत्येकाने आपल्या पदार्थाचे फोटो नेमून दिलेल्या परीक्षकाला पाठवायचे. विजेत्यांसाठी आम्ही कुटुंबातील काही जणांनी डिजिटल प्रशस्तीपत्र तयार केलं होतं व आमच्या आजोबांकडून विजेत्यांना गुगल पे मधुन कॅश प्राईज सुद्धा दिलं. आता पुन्हा आम्ही गायन स्पर्धेचं आयोजन करणार आहेत ज्यामध्ये आपल्या गाण्याचा ओडियो पाठवायचा आहे. तसेच सगळ्यांना जमु शकेल त्या दिवशी व त्या वेळेत आम्ही एकत्र व्हिडिओ काॅल्स सुद्धा करतो.”
पुण्याचा स्वराज सातार्डेकर सांगतो, “या मे महिन्यात आमच्याकडे सेलिब्रेशनचे बरेच निमित्त होते. बाबांचा ५०वा आणि आजोबांचा ७५वा वाढदिवस, आई बाबांचा २५ वा लग्नाचा वाढदिवस. या जंगी सेलिब्रेशनसाठी आम्ही एक मोठा समारंभ ठेवला होता पण लॅाकडाऊनमुळे तो रद्द करावा लागला. तरीही आम्ही व्हर्चुअल सेलिब्रेशन घडवुन आणंलं, बाबांना त्यांच्या वाढदिवशी आम्ही सरप्राईज म्हणून त्यांच्या मित्रांनी पाठवलेले व्हिडिओज दाखवले. संपूर्ण परिवाराने व्हिडिओ काॅल करून पाच सवाशिणींनी त्यांना ओवाळले. हे केल्यामुळे कार्यक्रम रद्द झाल्याचा जो हिरमोड झालेला तो कमी झाला कारण थोडावेळ का होईना आम्ही सगळे एकमेकांना त्या दिवशी भेटलो आणि मजा केली.”
सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रणी समजली जाणारी ‘चतुरंग प्रतिष्ठान‘ संस्था असं सांगते की, आमच्या सहा केंद्रांवरील कार्यकर्ते ही आमची एक्स्टेंडेड फॅमिलीच आहे. गेले ४६ वर्ष शिवाजी पार्क येथील उद्यान गणेश मंदिरात अक्षय्य तृतीयेला साजरा होणारा वर्धापन दिन आम्ही या वर्षी व्हिडिओ काॅनेफरन्सच्या माध्यमातून एकत्र जमून साजरा केला.
कोरोनाशी लढाई हे प्राधान्य आहेच. पण तरीही नेहमीची दिनचर्या बंद होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. त्याने थोड्याफार प्रमाणात मानसिक अस्वस्थता येऊ लागली आहे. या नकारात्मक वातावरणात कुठलेही नियम न मोडता रोजचे दिवस आनंदात कसे घालवता येतील हे महत्त्वाचे आहे. आजची तरूणाई या सोशल माध्यमांचा आणि अंगी असलेल्या कलांचा सुयोग्य वापर करून प्रत्येक दिवस हा कुटुंब दिवस म्हणूनच साजरा करते आहे.
मार्चपासून चालू असणाऱ्या या लॅाकडाऊनवर अनेक तरूण गंमतीत असही सांगतात, “शाळेनंतर इतक्या वर्षांनी पुन्हा घराच्यांसोबत अनुभवलेली ही ऊन्हाळ्याची सुट्टीच आहे”. जे विभक्त कुटुंब पद्धतीत आहेत, ते कामासोबतच आपल्या मुलांच्यातही रमत आहेत. वर्क फ्रोम होम, स्वयंपाक आणि मुलांना वेळ घालवण्यासाठी वेगवेगळ्या खेळांची निर्मिती यामध्ये त्यांची दिनचर्या पार पडत आहे.
मार्चपासून चालू असणाऱ्या या लॅाकडाऊनवर अनेक तरूण गंमतीत असही सांगतात, “शाळेनंतर इतक्या वर्षांनी पुन्हा घराच्यांसोबत अनुभवलेली ही ऊन्हाळ्याची सुट्टीच आहे”. जे विभक्त कुटुंब पद्धतीत आहेत, ते कामासोबतच आपल्या मुलांच्यातही रमत आहेत. वर्क फ्रोम होम, स्वयंपाक आणि मुलांना वेळ घालवण्यासाठी वेगवेगळ्या खेळांची निर्मिती यामध्ये त्यांची दिनचर्या पार पडत आहे.
आधी उल्लेख केल्याप्रमाणे आजच्या तरूणांची विस्तारीत किंवा एक्सटेंडेड फॅमिली असते. काॅलेज, शाळा, क्लासमधले मित्र-मैत्रिणी, ॲाफिसचे कलिग्स, इतर स्नेही हे आपल्याला घरच्यांसारखेच असतात. या गृपमध्ये कोणाचा वाढदिवस किंवा काही निमित्त असेल तर ते सेलिब्रेशन सुद्धा व्हर्चुअली केले जात आहे. प्रत्येकजण एक एक अक्षराची पाटी घेऊन फोटो काढत आहेत. त्या सगळ्या फोटोजचं कोलाज करून शुभेच्छा देत आहेत.
या सगळ्या गोष्टींचं तात्पर्य एकचं ते म्हणजे एकमेकांपर्यंत पोहोचता न येऊनही कनेक्टेड राहणे. घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे चालणारे हे जग आज पूर्णपणे थांबले आहे. वातावरणातला बदल म्हणून वाटणाऱ्या सुट्टीची आता सवय करावी लागणार हे निराशाजनक आहे. यामध्ये भर पाडणारे कोरोनाचे सावट परिस्थितीमध्ये नकारात्मकता आणत आहे. पण ही संधी म्हणून पाहता असा वेळ आपल्या कुटुंबासोबत आपल्याला नेहमी मिळत नाही असं म्हणत तरूणाई कुटुंबात रमली आहे.
कोरोनामुळे जणू संपूर्ण देश एक कुटुंबच बनला आहे. किंबहुना तो बनायची गरज आहे. या देशातला प्रत्येक नागरिक आज एक जबाबदार सदस्य आहे. या लढाईत स्वत: चा जीव धोक्यात घालून आपली जबाबदारी पार पाडणारे सुद्धा आपलेच कुणीतरी आहेत. हे संयमाचे सगळे दिवस कुटुंब दिवसच आहेत असं समजून आपण जागृक झालं पाहिजे. खरं कुटुंब तेच असतं जे अडचणींच्या काळातही घराच्या भिंती डगमगू देत नाही, एकमेकांची साथ सोडत नाही. या वर्षीचा कुटुंब दिन आपल्या वैयक्तिक आणि या जागतिक कुटुंबासह जबाबदारीने साजरा करूया.