ब्रिडा

पाउलो कोएलो हे नाव ‘अलकेमिस्ट’ या पुस्तकामुळे तरूणांमध्ये लोकप्रिय झाले. मुळत: ब्राझिलियन असलेला हा लेखक त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण कथानकाने तरूण वाचकांना आकर्षित करतो. या लेखकाचे कथानक सातत्याने  अद्भुत शक्ती, अंतर्मन, अशा विविध वलयांकित विषयांवर असते. त्याचा मूळ गाभा कोणा एका व्यक्तीवर असतो आणि त्याला पावलोपावली वेगवेगळ्या रूपात भेटणारा, सज्ञान करणारा गुरू असतो. हेच या लेखकाच्या लेखनशैलीचे वैशिष्ठ्य आहे आणि तरूण वाचकांना आकर्षित करणारा केंद्रबिंदू आहे. 
 
ब्रिडा एका तरूण आयरीश मुलीची कथा आहे जिला जादू शिकायची इच्छा असते. ही वयात आलेली मुलगी, अनेक प्रश्नांचे जाळे मनात ठेऊन; ते शोधण्याच्या ध्यासात असते. हे प्रश्न सामान्य नसतात.. गुढ शक्ती, जीवनाचे मागचे आणि पुढचे दाखले असे अनेक अनुत्तरित मानले जाणारे प्रश्न असतात. हे असे प्रश्न तिला का पडतात हे सुद्धा एक गुढच आहे. तिच्या मनात असे अनेक अंतर्कलह असतात, खुप गोष्टींची भिती असते, खुप गोष्टींची कुतूहलता असते. कदाचित यासाठीच तिला जादू किंवा अशी एखादी शक्ती शिकायची असते जी या सगळ्यावर हावी होईल. या कथेच्या नायिकेला लेखकाने खुप सुंदर रेखाटले आहे. हीचे वय, चिकित्सक बोलणे, नवीन गोष्टी शिकण्याचा अट्टाहास या छटा सामान्य तरूण वाचकाशी सहजपणे जुळतात आणि ब्रिडा आपलिशी वाटू लागते. ब्रिडा सुंदर आहे असं म्हणत आपण तिचे चित्र मनात तयार करतो.
 
हा लेखक फारशा कथा पात्रात अडकत नाही. याच्या कथेत कमीत कमी पात्र असतात. कथेत तो नेहमीच कुठल्यातरी अद्भुत ज्ञान किंवा शक्ती संर्वधनाचे काम करत असतो. हे वेगळेपण तरूणांना जास्त भावते. प्रेमकथा असो, रहस्य असो, संघर्ष असो त्यामध्ये एक प्रकारची अद्भुतता असते. निसर्गात एक काल्पनिक व्यापक शक्ती आहे, ज्यामुळे आपल्या आयुष्यातल्या आणि आजुबाजुच्या घटना घडत असतात, हेच लेखक सातत्याने सांगत असतो. ब्रिडा ही जादूटोणा, धर्म, अध्यात्म, पुनर्जन्म अशा गोष्टींची सरमिसळ आहे. लेखकाचे वलयांकित विषय म्हणजे हेच! हे विषय लेखनाच्या दृष्टीकोनातून कथेत उतरू शकतात हीच किमया आहे. ‘अलकेमिस्ट’ मध्ये ज्ञानगुरू होता पण ब्रिडा मध्ये साेलमेट आहे. ब्रिडाला तिच्या गुरू मध्ये तिचा प्रिय व्यक्ती सापडतो. त्याच्या शिकवणीच्या पद्धतीत ब्रिडा प्रेमात पडते. आधी तिला गुढ शक्तींबद्दल कुतूहलता होती पण ह्याला भेटल्यावर ब्रिडाने या विषयाचा ध्यासच घेतला. या शक्तीमार्फत तिला त्याच्या जवळ पोहोचणं, त्याला अधिक जाणून घेणं सोपं होतं असं तिला वाटू लागलं. 
या कथेच्या प्रस्तावनेत लेखक म्हणतो, जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक, जी काहीतरी तयार करणारी किंवा बांधणारी (टू बिल्ड) आणि दुसरी, काहीतरी पेरणारी (टू प्लांट). जी फक्त मनोरा बांधतात त्यांना माहीत असतं कधीतरी आपलं काम संपणार आहे. मनोरा बांधून संपणार आहे. पण जे काहीतरी पेरत असतात ते आयुष्यभर पेरतच असतात कारण पेरणं कधी संपत नाही. पेरून उगवतं आणि ते बहरत राहतं त्याची काळजी आपण सतत घेतच राहतो. म्हणून काहीतरी पेरण्यात जास्त समाधान आहे. त्याप्रमाणे ही कथा सुद्धा त्याने पेरली आहे. यातून प्रत्येकाला काहीतरी नवीन दिसत असतं, किंबहूना जितके वेळा वाचू तितके वेळा काहीतरी नवीन सापडत असतं. 
 
या कथेत दोन पद्धतीने हे अद्भुत ज्ञान संवर्धन आहे. चंद्र परंपरा आणि सूर्य परंपरा. चंद्र परंपरा काळाच्या पलीकडे जाऊन  दुरदृष्टी देते. सूर्य परंपरा आजूबाजुच्या घटनांमधुन ज्ञान  संवर्धन शिकवते. ब्रिडाला दोन्ही शिकायच्या असतात पण चंद्र परंपरेत अनेक गुढ गुपितं असतात. तिचा प्रेमरूपी गुरू तिला सूर्य परंपरा शिकवायला तयार होतो. त्यासाठी तिला अनेक परीक्षेतून सामोरं जावं लागतं. अनपेक्षित भीती आणि संघर्षांचा सामना करावा लागतो. पण ती या सगळ्यातून तरून निघते. तिचा ध्यास त्या शिक्षकाला प्रभावित करतो. तो ही तिच्या प्रेमात पडतोय असं त्याला वाटत असतं. पण ते दोघं ज्या वाटेवर असतात ती वाट सोपी नसते. त्या वाटेत खऱ्या खोट्याची पारख करणंच कठीण असतं. पुढेही अनेक वळणं येतात जिथे त्या दोघांनाही अवघड पर्याय निवडावे लागतात.
 
पाउलोने अशा नव्या पद्धतीच्या लेखनाची जणू नांदीच केली आहे. या विविध अनोख्या विषयांवरचे लेखन तरूणांमध्ये लोकप्रिय होत आहे. प्रत्येक लेखकाची शैली असते ती कधी त्याच त्याच प्रकारच्या पद्धतीमुळे कंटाळवाणी होऊ शकते. पण पाउलो त्याला अपवाद आहे. त्याचा एक विशिष्ठ वाचक वर्ग निर्माण झाला आहे. या कथेत किंवा या लेखनशैलीत कुठेही कल्पनाशक्तीचा विपर्यास आणि अतिशयोक्त वाटत नाही. या पद्धतीत कथानकाला धरून राहणे कठीण असते जे पाउलोने जमवले आहे. तरूण वाचकांसाठी पाउलोचे साहित्य हा नवीन अभ्यासाचा विषय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish