
प्रत्येकालाच कुठल्याना कुठल्या गोष्टीचं वेड असतं. पण त्या वेडाचे ध्यासात रूपांतर झाले तर तोच खरा कलाकार ठरतो. जो आपल्या क्षेत्रात नावीन्य आणण्याचा प्रयत्न करतो, किंबहुना जो स्वत:वर आणि स्वत:च्या स्वप्नांवर विश्वास ठेवून ते सत्यात उतरवण्याचे धाडस करतो तो प्रत्येकजण कलाकारच असतो.
ही गोष्ट आहे अशाच एका १९ वर्षाच्या कार वेड्याची. मुलगा म्हटलं की कार आणि बाईक्स चे वेड ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. मुळातच कार म्हणजे चार चाकी प्रवासाचे वाहन इतकचं आपल्या डोक्यात येईल. पण या पठ्ठ्याने मात्र त्याची व्याख्याचं बदलुन टाकली आहे. या युवकाचे नाव आहे सोहम सराफ. सोहमचा जन्म ठाण्याचा, पुढचे काही वर्ष त्याचे कुटुंब अमेरिकेत स्थायिक होते आणि आता पुण्यात वास्तव्याला आहेत. साधारण दीड वर्षाचा असल्यापासून खेळण्यातल्या हाॅटव्हील्स गाड्यांचे सोहमला फारच आकर्षण होते. पण ह्या आकर्षणाचे झोप उडवणाऱ्या स्वप्नात रुपांतर झाले ते अमेरिकेतल्या ‘काॅर्व्हेट संग्रहालयाला’ भेट दिल्यावर! त्या चार चाकांच्या यंत्रामध्ये काहीतरी जादू होती जी सोहमला शोधायची होती.
सोहमच्या वडिलांकडे सुरूवातीला मारूती ८०० होती मग मारूती झेन , जी सोहमला जास्त आवडू लागली. अमेरिकेत सोहमच्या या आकर्षणाची पाळंमुळं अधिक रुजत गेली. तिथे सोहम जसा मोठा होत होता तसे त्याच्याकडचे हाॅटव्हील्स कार संग्रह सुद्धा वाढत होते. आताच्या घडीला सोहमकडे ४०० हुन अधिक हाॅटविल्स कारचा संग्रह आहे. इतर मुलांप्रमाणे सोहमलाही कार संबंधित व्हिडिओ, टीव्ही शोज बघायची आवड होती. पण हे सगळं एवढ्यापुरतच त्याला ठेवायचं नव्हतं. मध्यमवर्गीय पालकांसारखी त्याच्याही पालकांची इच्छा होती की त्याने इंजिनिअरींग करावं. त्यानुसार पेस आय.आय.टी. मध्ये शिक्षणही चालू होते. अकरावी दरम्यान सोहमच्या लक्षात आले की आपली ही आवड नाही. बारावी विज्ञान शाखेत शिक्षण पूर्ण केल्यावर सोहमने एक वर्षाचा ब्रेक घेतला.
या ब्रेक दरम्यान ही चार चाकी जादू नक्की काय आहे याचा झपाटल्यासारखा अभ्यास केला. हे क्षेत्र काय आहे, ह्याचा आवाका किती आहे, भारतात किती आणि कसे फोफावले आहे याचे संशोधन केले. अकरावीचे शिक्षण घेत असतानाच २०१६ मध्ये सोहमने ‘द ड्रायवर्स हब’ या नावाने संकेतस्थळ तयार केले. त्यावेळी सोहमचे वय अवघे १५ वर्षाचे होते! या मागचे उद्देश असे की चार चाकी आणि दुचाकी वाहनांचे महत्त्व, या क्षेत्रातली कार्यपद्धती, यंत्रांच्या जडण-घडणीचा प्रवास, योग्य पद्धती आजच्या तरूणाईसमोर आणणे. हळू हळू त्याचा हा प्रवास जगासमोर येऊ लागला, लोकांना तो आवडू लागला आणि त्याने स्वत:चे यूट्यूब चॅनल देखील बनवले. त्याच्या चॅनलचे आता ५००० हुन अधिक सबस्क्रायबर्स आहेत. या चॅनलवर १५० हुन अधिक कार आणि बाईक्स चे व्हिडीओज आहेत. “मार्केटमध्ये नवी कार लाॅंच झाली की त्याचे व्हिडीओज सहज इंटरनेटवर पाहायला मिळतील. ‘द ड्रायवर्स हब’ वर आम्ही जुन्या कार माॅडेल्सची पुनरर्चना करून त्याच्या गोष्टी सांगतो. ती कार कधीची आहे, कुठे आणि कशी वापरली गेली होती, त्यातल्या तांत्रिक गोष्टी काय आहेत इत्यादी. हा आमचा युएसपी आहे. चॅनल वरचा होंडा एकाॅर्ड के२४ या गाडीचा व्हिडीओ पाहिला तर या कारकथा आम्ही कशा सांगतो हे नक्की कळेल.” असे सोहम सांगतो.
या सगळ्या व्हिडीओजला १ मिलीयनहुन अधिक लोकांनी पाहिले आहे. २०१७ मध्ये सोहमच्या ‘द ड्रायवर्स हब’ ने पहिला वहिला करार केला. तो होता ॲाडीसारख्या प्रशस्त कार कंपनी सोबत व्हिडीओज करण्याचा. ॲाडीच्या सोशल मिडीया पेजवर जाहिरात आणि प्रसिद्धी व्हिडीओज टाकण्याचे काम सोहमने हाती घेतले. ‘काॅफी विथ ॲाडी’ हा पहिला स्वतंत्र टाॅक शो पुण्याच्या शो रूम मध्ये द ड्रायवर्स हबने आयोजित केला.
सोहम पुढे सांगतो, “२०१८ हे साल द ड्रायवर्स हब (टी डी एच) साठी खूप महत्त्वाचे आणि यशस्वी ठरले. या क्षेत्रात आम्ही हळू हळू जम बसवत होतो. बरेच महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आम्हाला मिळत होते. १५ ॲागस्ट २०१८ आणि २६ जानेवरी २०१९ ला आम्ही पुण्यात अनेक प्रशस्त इव्हेंट्स केले. हे इव्हेंट्स व्यावसायिक दृष्टीने आमच्यासाठी खूप यशस्वी ठरले. पंचशील रिअल इस्टेट, हाॅटेल काॅनरॅड, जॅग्वार असे अनेक नामांकित ब्रॅंड्स, इव्हेंट्सचे प्रायोजक म्हणून आम्हाला लाभत गेले. आमचा चौथा सगळ्यात यशस्वी इव्हेंट होता, मिडनाईड रन’. जपानचे कार कल्चर आम्ही इथे साकारण्याचा प्रयत्न केला. लोकं आपल्या गाड्यांची पुनरर्चना करून एखाद्या भूमिगत जागी भेटतात. आम्ही यासाठी वेस्टएंड माॅलची पार्किंग जागा बुक केली होती. जवळ जवळ १०० स्पर्धकांची हजेरी लागली होती ज्यामध्ये सुझुकी पासून ते ॲाडी आर८ सुपरकार पर्यंत सगळ्या गाड्यांचा समावेश होता.”
टीडीएच ने आतापर्यंत मर्सिडीज बेन्ज, लॅंबाॅरगीनी, पोर्शे अशा अनेक नामांकित कार कंपन्यासोबत काम केले आहे. हे सगळं घडवुन आणणारा करता करविता १९ वर्षाचा तुमच्या आमच्या सारखा हा युवक आहे. सुरूवातीला छंद म्हणून जोपासताना, त्याचा आता एवढा मोठा पसारा झाला आहे. आता सोहमकडे त्याची सशक्त अशी टीम आहे. एकूण अकरा जणांची ही युवकांची कारवेडी टीम आहे. सध्याच्या परिस्थितीत सुद्धा हे स्वस्थ बसलेले नाहीत. टीडीएच चे इ-मॅग्झीन यंदा प्रकाशित झाले आहे. ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मॅग्झीन फोन, व्हीडिओ काॅल्स, या सगळ्या डिजिटल माध्यमातुन साकारले आहे. त्यामुळे हे खऱ्या अर्थानेच इ-मॅग्झीन आहे. या बद्दल सोहम सांगतो,” संपूर्ण प्रक्रियेत कोणीही कोणाला भेटले नाही, माझ्या टीममध्ये तीन मुले अशी आहेत ज्यांना मी कधी प्रत्यक्षात भेटलो देखील नाही. पण मॅग्झीनच्या रचनेपासून ते संपदानाची सगळी धुरा या तिघांनी सांभाळली आहे. मी ज्या टीमसोबत काम करतोय त्यातले सगळेच कामाशी समर्पित आहेत. मुख्य म्हणजे टीडीएचचा हेतु आणि ध्येय समजुन ते काम करत आहेत. सध्या पुणे, चेन्नई आणि कोची या तीन ठिकाणी आमच्या कामाचा व्याप आहे.” पण हे सगळं करताना शिक्षण सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे असं तो सांगतो. पुण्याच्या इंदिरा वाणिज्य महाविद्यालयात तो बीबीए चे शिक्षण घेत आहे. गेल्या दीड वर्षात या सगळ्याला योग्य ती दिशा देण्यात सोहमला यश आले आहे. त्याला आता मोठ्या व्यवसायात रूपांतर करायचे आहे. आता काळानुरूप प्रत्येक क्षेत्रातील पदवीचे शिक्षण विविध महाविद्यायात असते. योग्य ते शिक्षण आपले ध्येय साधण्यासाठी उत्प्रेरक ठरते असे सोहम मानतो.
“गाडी हे केवळ वाहतूकीचं साधन नसून आपली ओळख व्यक्त करण्याचं माध्यम आहे. इतर देशात गाडी खरेदी करण्याचा बाबतीत लोकं या दृष्टीकोनातून सुद्धा विचार करतात. भारतीय लोकांमध्ये आणि तरूणांमध्ये सुद्धा गाडीबद्दलची ही चिकित्सा आणि कुतूहलता यावी हा आमचा प्रयत्न आहे. सोशल मिडीया आणि डिजिटल मिडीयाची ताकद अजुनही आपल्याकडे लोकांना कळलेली नाही. ज्या तरूणांना त्यांचा स्वत:चा व्यवसाय करायचा आहे त्यांनी या माध्यमांना अंगवळणी पाडणं गरजेचं आहे. टीडीएच या माध्यमाच्या सहाय्यानेच एवढा मोठा पल्ला गाठु शकले आहे.” असा संदेश सोहम तरूणांना देतो.
अमेरिकन तत्वज्ञ इमर्सनने म्हटले आहे ‘ Every reform is once a private opinion’. प्रत्येक क्रांती, चमत्कार, बदल ही प्रथम माणसाच्या डोक्यातुन आलेली कोवळी कल्पना असते. त्या वेळी मात्र समाज त्याला वेडा, दिशाहीन वगैरे विशेषणांची लेबलं लावुन टाकतो. पण याच वेड्यामध्ये जिद्द, चिकाटी दिसुन आली की त्याच्या विचारांमध्ये तथ्य वाटु लागते. सोहमलाही असे अनेक अडथळे आले. पण त्याने ध्यास सोडला नाही. आज पुण्यातील आणि जगभरातील अनेक कार कंपनीचे मालक सोहमला आणि त्याच्या कार्याला फक्त ओळखत नाहीत तर त्याच्याशी सल्ला मसलतही करतात. हा प्रवास अनेक तरूणांना प्रेरणादाई ठरेल हे नक्की.