
या नावाचा खेळ आपल्या आई-आजीच्या काळात खूप लोकप्रिय होता. हातांच्या ओंजळीतून काचांचे तुकडे जमिनीवर पसरायचे आणि त्यातल्या सुटे सुटे तुकडे इतर काचांना न हात लावता वेचायचे. अगदी सोपा आणि सहज! पण पूर्वीच्या काळाची हीच तर खासियत होती. छोट्या छोट्या गोष्टीतून आयुष्य जगण्याची कला अवगत होईल असे संस्कार आपल्या लहानपणापासून होत गेले. त्या तुटलेल्या वेगळ्या काचा म्हणजेच काही निवडक सुखाचे क्षण, तेच खरे आपले वेगळेपण… हा एवढा व्यापक मतितार्थ त्यामागे दडलेला असायचा. आज आपण प्रौढ वयात जगत असताना हा अर्थ अगदी तंतोतंत जुळतो.
असाच ‘काचापाणीचा’ साहित्यरूपी खेळ मांडला आहे निवेदिका, नृत्यांगना, अभिनेत्री, लेखिका ‘संपदा जोगळेकर-कुळकर्णी’ यांनी. मुळत: शब्दांच्या प्रेमात असलेली ही लेखिका, सामान्य स्त्रियांच्या असामान्य कथा आपल्याला सांगते. या सगळ्या कथांमध्ये ज्या स्त्रिया आहेत त्या सगळ्या आपल्या अगदी रोजच्या जीवनातल्या आहेत. त्या सामान्य, मध्यमवर्गीय गृहिणींची स्वप्नं, आशा, अपेक्षा या सगळ्या मध्येच त्यांचा असामान्यपणा लपलेला असतो. लेखिकेने तो अगदी अचूक टिपला आहे. आजची अभिव्यक्ती साधने ‘स्टोरी-टेंलिंग पद्धतीची आहेत. या पुस्तकाचा बाज तसाच आहे आणि तेच तरूण वाचकांना या लेखनाकडे आकर्षित करते. फार शब्द जंजाळात न अडकता कथानकाला धरून या गोष्टी आहेत. काहीशा काल्पनिक, काहीशा वास्तववादी लेखनाची मोट समतोल राखून बांधली आहे. भाषेतला सोपेपणा, तरल भाव, सतत जाणवणारे सामान्यत्व, हे या पुस्तकाचं वेगळेपण म्हणायला काहीच हरकत नाही. हे पुस्तक वाचताना कधी कधी सुधा मुर्तींच्या वाईज-अदरवाईजचा भास होतो. इंग्रजी पुस्तकांची आवड निर्माण व्हायला तरूणाई सुधा मुर्तींची पुस्तके अगदी हमखास वाचतात. तसेच भाषेची आवड आणि गोडी निर्माण करायला हे पुस्तक हाती घ्यायला काहीच हरकत नाही.
यातल्या कथा स्त्री प्रधान आहेत हे आतापर्यंत कळलंच असेल पण त्या आजच्या सो काॅल्ड ‘फेमिनीस्ट‘ नक्कीच नाहीत. वेगवेगळ्या पातळीवरची ‘ती’ची बदलती रूपे, तिच्या समस्या, तिच्या अंतर्मानाचे कलह:, अशा विविध छटा दाखविल्या आहेत. पण त्यातून ‘वाचा फोडायला हवी‘ किंवा ‘ हे असे का?‘ असा कुठलाही निष्कर्ष, अट्टाहास नाही. हे पुस्तक म्हणजे शब्दांच्या गावी जावे आणि तिथल्या हिरवळीचा आनंद घ्यावा. या लिखाणात निवेदकाच्या शब्दांसारखीच ओघवती भाषा आहे. कलाकारासाठी माध्यम महत्त्वाचे नसते, त्याला फक्त त्याचे मन प्रेक्षकांच्या मनाशी जोडायचे असते. हे या पुस्तकातून प्रकर्षाने जाणवते. तरूणांसाठी आज अनेक आधुनिक माध्यमे आहेत पण अनेक पर्याय असतानाच आपण गोंधळून जातो. पुस्तकांचा सहज सोपेपणा विसरतो. पुस्तकांना विशिष्ट सुगंध असतो, स्पर्श असतो हे सगळे तरल भाव हे पुस्तक वाचताना जाणवतात. हे भाव तरूणाईला आजच्या काळात एक छोटासा कथा संग्रह वाचताना जाणवतात, असे लेखन लेखिकेकडून नकळतपणे व्हावे हे कौतुकास्पद आहे.
प्रत्येक पुस्तकात कुणीतरी एक कथा सांगत असतो, कथेचा नायक असतो. कथा संग्रहात स्वत: लेखक सांगत असतो. पण या कथांमध्ये प्रत्येक कथेत त्या कथेची वेगळी नायिका आहे. सोनं किंवा कुठलाही धातू पॅालीश करताना वाढत्या तापमानासोबतच एका विशिष्ट घर्षणामधून जावं लागते. ते घर्षण नवा आकार, रंग, रूप घेण्यासाठी असते. या पुस्तकातल्या कथा नव्या-जुन्याचा संगम साधणाऱ्या आहेतच, पण तो संगम साकारताना हे घर्षणसुद्धा फार उत्तम रेखाटले आहे. हा पैलू ‘मापटं’ सारख्या कथेत आढळतो. या कथांमध्ये डेलीसोपसारखे धक्कातंत्र नसले तरी चढउतार आहेत. ‘पनीर’ या कथेत सुरूवात एका विषयापासून होते पण शेवट मात्र अनपेक्षित वळणावर येऊन पोहोचतो. ‘मेघ कालीदासाचा’मध्ये प्रौढ, नाजूक, भावनिक विषय सुद्धा अगदी लीलया मांडले आहेत.
निवेदन, रंगभूमी, नृत्य अशा विविध कलांच्या फुलांवर सुगंध पसरवणाऱ्या या लेखिकेचे शब्दरूपी पुष्प तरूणाईच्या मनात घर करून राहील हे नक्की.