फॅशनची दुनिया काही वेगळीच असते. कधी ती पारंपारिक साज देते तर कधी अगदी हटके आणि ट्रेण्डी स्टाईल देते आणि कधी दोन्हीचा संगम साधून समकालीन होते. पण या सगळ्यात सर्जनशीलता असते. काही फॅशन्स सतत वेगवेगळं काहीतरी समोर आणतात तर काही मुळत: न बदलता आधुनिक ट्वीस्ट देऊन समोर येतात. काळानुरूप सेलिब्रिटीजसह तरूण मुलंमुलीसुद्धा फॅशन बद्दल सजग राहू लागले आहेत. आता ती फक्त कपड्यापुरती मर्यादित न राहता अगदी नखशिखांत झाली आहे. तुम्ही काय कपडे घालता या सोबतच त्याला साजेशी ज्वेलरी, मेकअप, शुज/फुटवेअर या सगळ्या गोष्टींनासुद्धा तितकेच महत्त्व आहे. आपण पूर्णपणे स्टाईल आयकाॅन दिसायला हवं या बद्दल तरूण मुलं मुली आग्रही असतात. या सगळ्या फॅशन पार्श्वभूमीचा पूर जिथे पाहायला मिळतो ते ‘फॅशन शोज’ ही तरूणांसाठी उत्सुकतेची बाब असते. या वेळी कुठल्या डिझायनरची काय वेगळी स्टाईल असेल, काय रंगसंगती असेल ते अगदी आपण काय कपडे घालावे अशी सगळी तयारी करायला सुरूवात होते.
या फॅशन विश्वातील सगळ्यात लोकप्रिय आणि बहुचर्चित शो म्हणजे ‘लॅकमे फॅशन वीक!’ शोचं यंदा हे विसावं वर्ष पार पडलं. या वीस वर्षात फॅशन विश्वातील अनेक मोठी मोठी नावं इथूनच आपल्याला मिळाली. अगदी कपड्यांपासून ते फुटवेअर पर्यंतची बदलती स्टाईल स्टेटमेंट लॅकमेतून पाहायला मिळतात. साधारण घरी असणारी आपली आई-आजीसाठी चप्पल म्हणजे बाहेर जाताना घालायचे ‘पायताण’… इतपतच त्याला महत्त्वं! तसंच तरूण पिढीसाठी कॅजुअल वेअर, ॲाफिस वेअर, पार्टी वेअर अशा वेगवेगळ्या निमित्तांसाठी चपला असतात. लॅकमेच्या विसाव्या वर्षाची खासियत म्हणजे हीच फुटवेअर मधली विविधता. या विविधतेमध्ये आधुनिकता आणि परंपरेचा संगम प्रकर्षाने जाणवला. कपड्यांमध्ये विविध फॅब्रिक आणि रंगसंगतीचा वापर करून वैविध्य आणले जाते पण चप्पलांसाठी पण तीच पद्धत वापरली तर अर्थातच त्यात किती नाविन्य असेल. हा ट्रेण्ड लॅकमेच्या रॅंपवर अगदी सुरेख पद्धतीने दिसला. पाश्चात्य कपड्यांवर उंच टाचेच्या चपला घालणं हे काही नविन नाही किंबहुना तशी पद्धत आणि गरजच आहे. पण डेनीम कापडातून जसे पारंपारिक कपडे बनतात तसाच चपलांना सुद्धा का नाही पारंपारिक फिल द्यायचा!
जे कपडे आपण घातले आहेत त्याच कापडाच्या किंवा साधारण चपलांसाठी टिकाऊ असणाऱ्या फॅब्रिकच्या चपला घालून तशी स्टाईल करणं हा ट्रेण्ड झाला आहे. भारतीय पद्धतीच्या फ्लॅट जुती चपला सुद्धा वेगवेगळ्या कापडात आणि फॅशनमध्ये रॅंपवर दिसल्या. ‘श्वेता टांटीया’ यांचे ‘ताहविव- विसकोसो’ कलेक्शन यावरच्या फुटवेअरमध्ये कमालीचे वेगळेपण होते. जुती आणि लेसचा वापर अगदी अनोख्या पद्धीने दिसला. फक्त पायाच्या बोटापर्यंतचे कापड वापरून मागे लेसने बांधलेले ‘हाफ जुती’ इथे दिसले. डिसायनर श्वेता म्हणतात, “कपड्यांच्या रंगाला अगदी साजेसं पण वेगळं असं काहीतरी हवं होतं. मोडेल्सना वाॅक करताना उत्तम दिसणं जेवढं महत्त्वाचं असतं तेवढच व्यवस्थित चालता येणं सुद्धा महत्त्वाचं असतं. म्हणून त्यांना चालायला अगदी कम्फर्टेबल वाटावं या विचाराने हे फुटवेअर बनवले.” कपड्यांमध्ये सध्या पेस्टल रंगांची लोकप्रियता वाढत चालली आहे. हेच रंग आता फुटवेअर मध्ये सुद्धा वापरायला सुरूवात झाली असून ते अगदी मनमोहक सुद्धा वाटतात. चपलांमध्ये रंगसंगती करणं तसं दुर्मिळच, कारण त्यात ठराविक रंग असतात. जे मळखाऊ आणि टिकाऊ असतात. पण लॅकमेच्या मंचावरून ही रंगसंगती सुद्धा पाहायला मिळाली. डिझायनर आनंद काब्रा यांचे कलेक्शन आयवोरी आणि शिमर पद्धतीचे होते. त्यावरसुद्धा अगदी साजेसे एमब्राॅयडरी जुती त्यांनी वापरली होती. अगदी प्लेन पण जराशी चमक असलेल्या कापडांवरची ही रंगरंगोटी उठावदार दिसत होती.
कलाकारासांठी रंगमंच ही पवित्र जागा असते. प्रयोगाला किंवा सादरीकरण करताना कलाकार सहसा चपला घालत नाहीत. असेच काहीसे विचार काही डिझायनर्सचे आहेत असं वाटलं. रॅंपवर चालणं हे मोडेल्सचं आणि पर्यायाने डिझायनर्सचं सुद्धा एक प्रकारे कलाक्षेत्रचं आहे. एथनिक कलेक्शन असलेले डिझायनर्स ‘गौरांग शाह’, आपली मराठमोळी ‘वैशाली शडांगुळे’ यांच्या मोडेल्सच्या पायात अनेक वेळा कुठल्याच पद्धतीच्या चपला नसतात. यांचे कलेक्शन भारतातल्या विविध प्रांतांच्या संस्कृतीतून प्रेरित झालेले असते. त्यामुळे कुठलेही शुभकार्य किंवा रंगमंच सादरीकरण असताना आपल्या पायात शक्यतो चपला नसतात, हा सांस्कृतिक समभाव फॅशनच्या पार्श्वभूमीवर दिसणं ही बाब सुद्धा कौतुकास्पद वाटली.
जसा पेस्टल रंगांचा वापर वाढला आहे तसा ग्लाॅसी आणि निॲान कलर वापरणं सुद्धा ट्रेंण्ड होत चालला आहे. या स्टाईलचा जास्त वापर हाय हिल्समध्ये केला जातो. पार्टीवेअर किंवा ॲाफिसवेअर फॅार्मल्सवर असे हिल्स खूप शोभून दिसतात. ‘समा, मीरा आणि मुझफ्फर अली’ या डिझायनर परिवाराच्या कोटवारा ब्रेंण्डमध्ये हे हाय हिल्स वापरले गेले. मुळात कपड्यांमध्ये थोडसं शीमर असताना त्यावरच्या हिल्स साध्या असाव्यात ही रंगसंगतीची समज डिझायनरला आत्मसात करावी लागते. डिझायनर ‘रीना सिंग’ हीचा ‘एका’ हा लोकप्रिय ब्रॅण्ड आहे. तिने तेलंगणा स्टेट विवर्स असोसिएशन सोबत हात मिळवणी करून भारतीय टिकाऊ फॅब्रिकची फॅशन दाखवली. याचा रंग आणि फील मुळातच थोडा डल असतो म्हणून जरा वायब्रण्ट रंगाचे शुज वापरले. यात सुद्धा हाय हिल्स आणि बेल्टचे शुज आणून वेगळेपणा दाखवण्याचा प्रयत्न केला होता.
या वर्षीची आणखीन एक खासियत म्हणजे बाटाने अनेक डिझायनर्स सोबत हातमिळवणी केली असून फॅशन रॅंपवर बाटाचे कमालीचे आधुनिक पद्धतीचे फुटवेअर दिसले. बाटाची ओळख म्हणजे साधारण शाळेचे काळे बूट, डाॅक्टर चपला किंवा टिकाऊ लेदरच्या चपला ज्यांचा डिझाईन आणि रंगांशी फार संबंध नसतो. परंतू लॅकमेच्या मंचावर बाटाचे आधुनिक आणि सुशोभित रूप पाहायला मिळाले. बाटाचे सी.ई.ओ., ‘संदीप कटारीया’ म्हणतात, लॅकमे फॅशन वीकच्या मंचावर येणं ही नेहमीच खास बाब आहे. यावेळी बाटाने ‘रेट्रो फॅशन’ वेगळा डिझाइन ट्वीस्ट देऊन आणायचं ठरवलं. पण इथे कुठेही सर्जनशीलता आणि दर्जा यामध्ये कमी पडायचं नव्हतं. तुम्हाला स्पर्धेत टिकून रहायचं असेल तर नाविन्य साधणं गरजेचे आहे. तेच बाटाने लॅकमेच्या मंचावर करण्याचा प्रयत्न केला.”
फॅशन चक्राकार फिरत असते. कुठलीही एक पद्धत पूर्णपणे कालबाह्य होत नाही. ती वेगवेगळ्या पद्धतीने समोर येते. हेच या क्षेत्राचे वैशिष्ठ्य आहे. ते प्रायोगिक क्षेत्रसुद्धा आहे. दरवेळी काहीतरी नवीन हाती लागेलच, मग तुम्ही ते प्रेक्षक म्हणून आत्मसात करा किंवा डिझायनर म्हणून कामातून अंमलात आणा. तसचं काहीसं या वर्षीचं नावीन्य म्हणजे कपडे आणि मेकअप सोबतच फुटवेअरच्या फॅशनची पर्वणी पहायला मिळाली.