Elementor #1690

या शतकातली २५ विशी म्हणजेच २०२५ सुरु झाले आहे. सरत्या वर्षाच्या कडू-गोड़ आठवणी अजूनही मनात रेंगाळत असतील. परंतु आयुष्यातल्या पंचविशीत जसा नवीन अध्याय सुरु होतो तसेच हे वर्ष पण नवीन अध्याय समजून त्याला सामोरे जाऊया. अनेक संकल्प, इच्छा, छंद, ध्येय, अपूर्ण राहिलेल्या गोष्टी यांनी हे वर्ष भरभरून टाका. नव्या वर्षात एखादी तरी नवीन गोष्ट करण्याची, शिकण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनी असतेच. तरुण वर्ग नवीन गोष्टी धाडसीपणे करण्यात काही मागे नाही. चांगली नोकरी ही आत्ताची गरज आहेच परंतु सध्या एक नवा ट्रेंड तरुणांमध्ये दिसून येतो तो म्हणजे आपल्या गावात राहून तिथून एखादा चांगला व्यवसाय किंवा जमेल ती नोकरी करणे. यामागची प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असली तरी मुख्य कारण म्हणजे शहराचे आकर्षण असले तरी आपले मूळ जिथे आहे तिथूनच आपल्याला आपले अर्थार्जनाचे साधन मिळाले आणि तिथेच राहून आपल्याला काम करता आले तर यासारखे सुख दुसरे नाही.

पुर्वी अशी परिस्थिती होती की गावाकडे राहायचे म्हणजे शेतीची तत्सम कामे करणे व साधं आमटी भात करून खाणे. परंतु आता अगदीच काही तशी परिस्थिती राहिलेली नाही. गावाकडे अर्थार्जनाच्या संधी चांगल्यापैकी वाढल्या आहेत. मुळातच आता विविध क्षेत्र विकसित झाली आहेत, त्यातच तरुणपिढीकडे प्रयोगशीलता आणि सर्जनशीलता आहेच त्यामुळे ही क्षेत्र त्यांच्या पद्धतीने कशी एक्सप्लोर करायची याचे ज्ञान आणि धाडसही त्यांच्याकडे आहे.

विक्रम होशिंग यांचे क्षेत्र कमालीचे वेगळे आहे आणि त्यात अनेक नवीन प्रयोग ते करतायेत. त्यांची डॉग बिहेविअर मॉडिफिकेशन फॅसिलिटी आहे ज्यामध्ये ते पाळीव कुत्रे आणि त्यांचे मास्टर ह्यांना कन्सल्टेशन देतात. पाळीव कुत्रे घेण्यापासून ते त्यांचे पालनपोषण करेपर्यंत काय करणे गरजेचे असते जवळपास या सगळ्याचे समुपदेशन ते करतात.

ते सांगतात, “पुण्याच्या थोडंसं बाहेर मुळशीच्या जवळ आमची ही फॅसिलिटी होती जिथे कुत्र्यांचं बोर्डिंग सुद्धा होतं की ज्या कुत्र्यांना कुठेच ठेऊन घेत नाही कारण ते फार आक्रमक असतात, चावरे असतात अशा कुत्र्यांना आम्ही ठेऊन घ्यायचो. मुळशीच्या जवळ आम्ही २०२१ पर्यंत होतो. आता आम्ही गोव्यात असतो तेही शहराच्या थोडं बाहेरंच जिथून आम्ही वाईल्डलाईफशी जास्त जोडलेले आहोत. आधी आम्ही डोमेस्टीक पातळीवर काम करत होतो आता वाईल्डलाईफशी निगडित प्राण्यांसोबत जास्त काम करतो.” पुढे ते सांगतात, “माझे क्षेत्र हे प्राण्यांशी निगडीतंच आहे पूर्वी मी जी नोकरी करत होतो ती वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया आणि त्यापध्दतीच्या अनेक संस्थांची प्रोजेक्ट बेसिसची नोकरी असायची. परंतु तेव्हा जोपर्यंत तुमच्या हातात प्रोजेक्ट आहे तोपर्यंत काम असायचं. हळू हळू वाटायला लागला की थोडं स्वतःचं काहीतरी असायला हवं पण प्राण्यांशी निगडीतच हवं होतं, माझ्या बायकोचे मास्टर्स हे क्लिनिकल सायकॉलॉजी आणि ऍनिमल वेल्फेर अँड बेहेविअर या विषयात झाले आहे.”
तुमची पॅशन आणि काम तुम्हाला एकत्र करायचे असेल तर थोडी जोखीम, थोडी तडजोड ही करावीच लागते परंतु अंती तुम्हाला जे मिळतं ते नक्कीच समाधानकारक असेल.

सध्या शहरातली धावपळ आणि थोडी अनिश्चित जीवनशैली सगळ्यांना आवडेल किंवा जमेलच असं नाही. काही तरुणांना थोडी स्थिरता, कुटुंब आणि चांगल्या दर्जाची जीवनशैली देखील हवी असते. हर्षद तुळपुळे हा राजापूर तालुक्यातील अणसुरे गावात त्याच्या कुटुंबासोबत राहतो. MA (Econmics) आणि PG Diploma (Sustanaible Management of Natural Resources) असे त्याचे शिक्षण झाले असून; त्याने २०१६ ते २०२० च्या कालावधीत मुंबई आणि पुणे येथे ४ वर्षे प्रसारमाध्यमात नोकरी केली. त्यानंतर पर्यावरण विषयक संस्थांसोबत काही प्रकल्पांमध्ये काम करायला सुरुवात केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा आपल्या गावी स्थायिक होण्याच्या निर्णयाबद्दल तो सांगतो, ” पुन्हा इथे येण्यासाठी माझी २-३ कारणे होती ती अशी म्हणजे आपल्याकडे चांगला कम्प्युटर असेल तर हव्या त्या ठिकाणी राहून चांगले काम करू शकतो. तसेच माझे आई बाबा इथे दोघंच असतात आणि मी एकुलता-एक असल्याने त्यांच्यासोबत राहणारे मला गरजेचे वाटू लागले. शहरात फक्त नोकरीसाठी राहणे म्हणजे तिथली प्रतिकूल परिस्थिती, तिथे राहायला जागा, त्यासाठी भाडे, त्यासाठी चांगली नोकरी, प्रदूषण युक्त प्रवास, त्यातूनही आपले असे कोणी नसते, आपल्या सोबतचे सहकारी फक्त कामाच्या ठिकाणी आणि कामाच्या वेळीच आपल्याला भेटतात. आपल्या आवडीच्या ठिकाणी राहून आपण काम केले तर ते जास्त चांगल्या पद्धतीने होते असेही मला वाटते म्हणूनच २०२० पासून आता ३-४ वर्षे मी गावाला राहून प्रोजेक्ट बेस्ड किंवा फ्रीलान्सिंग पद्धतीचे काम करतो आहे. यात आयआयटी मुंबई संस्थेच्या उन्नत महाराष्ट्र अभियान प्रकल्पामध्येही माझे काम चालू होते, याशिवाय पुस्तक प्रकाशन, दिवाळी अंक प्रकाशन, दिनदर्शिका प्रकाशन, असे इतर उद्योगही सुरु असतात. मी थोडा अशा मताचा आहे की आपल्या घरी राहून जे करता येईल किंवा जे करणे शक्य असेल ते चालेल, ४ पैसे कमी मिळाले तरी हरकत नाही.”

आता गावांमध्येही इंटरनेट आणि इतर पायाभूत सुविधा चांगल्यापैकी पोहोचल्यामुळे घरबसल्या अर्थार्जन करण्याच्या संधीत वाढ नक्कीच होत आहे. बागायतीवर आधारित उद्योगांच्या वाढीला वाव आहे. आज आर्थिक प्रगती साधण्याचे अनेक मार्ग गावातही उपलब्ध आहेत. पुढे तो असेही सांगतो, “रोजगाराच्या संकल्पना झपाट्याने बदलत आहेत. वर्क फ्रॉम होम, फ्रीलान्स, प्रोजेक्ट बेस्ड जॉब असे अर्थार्जनाचे अनेक नवीन मार्ग प्रस्थापित होत आहेत. यामुळे शहरांकडून गावांकडे या पुनर्स्थलांतरणाला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असेल तर आमच्या सारख्या तरुण पिढीने त्याचा फायदा का घेऊ नये!

या सगळ्या गोष्टी अगदी प्रेरणादायी आणि भारावून टाकणाऱ्या असल्या तरी हातातली नोकरी किंवा निश्तित उत्पन्नाचे काम सोडून हा निर्णय घेणे हे सोपे काम नाही. मग असे निर्णय तरुण पिढी नक्की काय विचार करून घेते किंवा त्यांना ही जोखीम हाती घेताना भीती वाटत असेल/नसेल यावरही बोलणे गरजेचे आहे. या मुद्द्यावर हर्षद सांगतो, “मी आधीपासून जरी ठरवले असले की पुन्हा आपल्या गावीच यायचे तरीही हा निर्णय घेताना अनेक आव्हान आली. सगळ्यात पहिले म्हणजे चांगल्या प्रकारचे अर्थार्जन होणे गरजेचे होते, दुसरा मुद्दा असा की लग्न या गोष्टीबाबत अनिश्चितता असते. यामुळे साहजिकच पिअर प्रेशर येऊ शकते, शहरातली नोकरी सोडून गावात येऊन राहणं म्हणजे मोठं काही करण्याची क्षमता नसणं असाही अर्थ घेतला जातो. काही अडचणी आल्या तर आपला निर्णय कसा चुकला याचीच चर्चा होणारं वातावरण आजूबाजूला असतं. पण थोडासा बिनधास्तपणा दाखवून या आव्हानांवर मात करता येऊ शकते.

गावात राहून मला जशा रोजगाराच्या संधी मिळत आहेत तशाच सर्वांना मिळतील का? एका गावातले १०० तरुण शहर सोडून गावात येऊन राहिले तर सगळ्यांना चांगल्या उत्पन्नाचा रोजगार मिळेल का? याचं उत्तर निश्चितपणे ‘हो’ असं नाही देता येऊ शकत. प्रत्येकाची कौटुंबिक पार्श्वभूमी वेगळी असते. एक निश्चित आहे की पूर्वीच्या तुलनेत गावात व्यवसायाच्या संधी वाढत आहेत. थोडीशी चौकस बुद्धी ठेवली तर त्या संधी आपल्याला दिसतात आणि आपण योग्य निवड करू शकतो. स्थिर मासिक उत्पन्नाशी थोडीशी तडजोड, शारीरिक मेहनतीची कामं करण्याची थोडीशी तयारी, सामाजिक दबावाला न जुमानण्याची बिनधास्त वृत्ती अशा काही गोष्टी तरुण पिढीला गावात राहून व्यवसाय करण्यासाठी साहाय्यभूत ठरू शकतात. शेवटी ज्याने त्याने आपापला विचार करून आपापला मार्ग निवडावा.”

विक्रम होशिंग सांगतात, “आमचं क्षेत्र थोडं वेगळ असल्याने आणि आम्ही लांब राहत असल्याने लोकांना पहिले माहित करून घेण्यातच वेळ गेला. त्यात आमची कुठेही वेबसाईट नाही जे काही लोकांना कळलं ते माऊथ पब्लिसिटीनेच. आम्ही मुळशीतून पुण्यात प्रवास करायचो जिथे ट्रेनिंग द्यायचे असेल त्या जागी जायचो. हळू हळू लोकांना आमच्या बद्दल कळायला लागले आणि मग लोकच आमच्याकडे येऊ लागली. पण हे होण्यासाठी २ वर्षाचा कालावधी आम्हाला द्यावा लागला.
या बरोबरच आम्ही फक्त कुत्र्यांना प्रशिक्षण देत नव्हतो. आम्ही ओनरला सुद्धा हे अनिवार्य करायचो कारण तुम्ही तो पाळला आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा या गोष्टी समजणे गरजेचे आहे. या विचारामुळे आमचे काही क्लाएंट्स कमी झाले परंतु ही गोष्ट आम्ही बदलली नाही. फक्त कुत्र्याला प्रशिक्षण देऊन चालत नाही त्यांचा ओनरला सुद्धा रोजच्या आयुष्यात बदल आणावेच लागतात. तुम्ही त्या कुत्र्याला घरचा सदस्य बनवू शकता परंतु माणूस बनवायला गेलात तर ते शक्य होणार नाही. हे सगळे विचार तेव्हा लोकांना नवीन होते. अशी काही आव्हानं तुमच्यापुढे येऊ शकतात ज्याचा विचार तुम्ही आधी केलेला असला पाहिजे.”

या पद्धतीच्या करिअरमध्ये अनेक इन्फ्लूएंसर, सेलिब्रिटी यांची सुद्धा भर पडली आहे. आपली आवड, गरज, विचार, ध्येय, प्राधान्य या सगळ्यांचे समीकरण साधून आजची पिढी असे धाडसी निर्णय घेत आहे.
लोकप्रिय युट्युब चॅनल ‘रेड सॉईल स्टोरीज’ म्हणजेचं पूजा आणि शिरीष गवस सांगतात, “आमच्या शिक्षणाचा म्हणजेच डिजिटल मार्केटिंग आणि फिल्म मेकिंगचा आपल्या मातीला कसा फायदा होईल हे आमचं ध्येय होतं. त्याचबरोबर शहरातले धकाधकीचे जीवन सोडून आपल्या गावातल्या मातीत स्वतःचं काहीतरी उभं करायचं होतं. काही प्रमाणात तरुण पिढीला प्रेरणा मिळेल हे देखील उद्दिष्ट होतं. असं काहीतरी करताना सगळ्यात पहिले आव्हान येते ते म्हणजे आपल्या आई वडिलांना आणि घरातील मोठ्यांना हे समजवून देणे. त्यांची पिढी हे कळायच्या आकलनाची नाही. त्यामुळे सोशल मीडिया मधून अर्थार्जन होऊ शकते आणि संसार चालू शकतो हे पटवून देणे अवघडच असते. त्याखेरीज इथे सुद्धा थोडं लांब असल्यामुळे मनुष्यबळाची कमतरता जाणवते, तुम्ही बघता ती अगदी भांडी-कुंडी, घर, पूर्ण सेट-अप हे सगळंच आम्ही स्वतः उभारले आहे. तसेच प्रोफेशनली एखादी गोष्ट करायची म्हटली तर तांत्रिक बाबी सुद्धा परफेक्ट असायला हव्यात. शहरापेक्षा लांब असल्यामुळे अनेक चांगल्या संधींना सुद्धा मुकावे लागते त्याची खंत असते पण इथल्या वातावरणात आणि संस्कृती मध्ये ते विसरायला होते.
थोडक्यात काय तर थोडीशी तडजोड, जिद्द, सातत्य आणि तुमची कला प्रामाणिकपणे सादर करणे याचा समन्वय साधला तर आज काहीही शक्य आहे. एक गोष्ट मात्र तरुणपिढीने कटाक्षाने पाळायला हवी ते म्हणजे सोशल मीडियाचे जग हे भयंकर अस्थिर आहे, बेभरवशी आहे त्यामुळे तुमच्या कामाचा सातत्याने दर्जा राखणे गरजेचे आहे. तुम्ही जे बघताय ते बऱ्याच दिवसांच्या कष्टाचे चीझ आहे त्यामुळे या क्षेत्रात आणि अशा निर्णयातही संघर्ष आणि परीक्षा चुकलेली नाही.”

एका बाजूला प्रौढांचे विचार असतात की हल्लीची तरुण मुलं आपली मुळं विसरली आहेत, त्यांना ता जुन्या पद्धती आणि संस्कृती मध्ये विशेष स्वारस्य उरलेले नाही परंतु ही अशी असंख्य उदाहरणे आहेत ज्यातून आजच्या तरुणाईला फक्त पैसे कमावणे हे ध्येय नसून आपली आवड आणि व्यवसाय एकत्रित करण्याचा अट्टाहास आहे. आपली आवड जपताना कुठेतरी ही पिढी आपली मुळं घट्ट धरून उभी आहे. नव्या वर्षात आणि इथून पुढे सुद्धा तरुण पिढीचा हा ट्रेंड अधिक वृद्धिंगत होत राहूदे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish