
काही वर्षांपुर्वी एखाद्या वाढदिवसाचे बोलवणे आले की एकचं अप्रुप असायचे ते म्हणजे केकचे. त्यावेळी व्हॅनिला आणि चाॅकलेटचे काॅंबिनेशन असलेला, रेड चेरीने सजविलेला केक हेच आकर्षण होते. तसा केक घरात आला म्हणजे काहीतरी खास आहे असे वाटायचे. ब्लॅक फोरेस्ट, पाईनॲपल, डार्क चाॅकलेट या सोबतच फोटो केकचा ट्रेंण्डसुद्धा अगदी आता आतापर्यंत लोकप्रिय होता.
पण आताचा ट्रेंण्ड हा थीम आणि कस्टमाईझ्ड केक्सचा आहे. मुळात छोट्या छोट्या निमित्त्तांचा उत्सव, समारंभ करणं, सध्याचा काळ असल्यामुळे ते साजरा करण्याच्या पद्धती ही आधुनिक आणि फॅन्सी झाल्या आहेत. लहानांपासून ते अगदी बुजुर्गांपर्यंत सगळेच ताव मारू शकतील अशा विविध कल्पनांमधून हे केक साकारले जातात. विशेषत: ह्या केक्सची सजावट करताना फाॅण्डंट आयसिंगचा वापर जास्त प्रमाणात केला जातो ज्यामुळे पूर्ण केक खाण्यायोग्य होतो. हे बनविण्याची प्रक्रिया बरीच क्लिष्ट असते.
निधी सागवेकर गेली दोन वर्ष विविध थीम केक ॲार्डर प्रमाणे बनविते. ती सांगते, “फाॅण्डंट म्हणजे फार वेगळं काही नसून सारखेपासून विशिष्ट पद्धतीने बनविलेले आयसिंग असते. त्यापासूनच थीम केक्सची सजावट केली जाते. ते पूर्णपणे सुकावे लागतात, ज्यासाठी कमीतकमी ४८ ते ७२ तास लागतात. म्हणूनच सजावटीचे साहित्य दोन दिवस आधीच बनवावे लागतात. त्यांनतर मुख्य बेस केक बनवायला साधारण तासभर लागतोच.”
फातेमा तांबावाला गेली तीन वर्ष ॲार्डर53 या नावाने तिचा होम बेकींगचा ब्रॅण्ड चालवते आहे, ती सांगते, “फाॅण्डंट मध्ये सजावटी प्रमाणे विविध रंग असतील तर तेवढी वेगवेगळी भांडी सुद्धा वापरावी लागतात. तसेच आकारांसाठी कधी कधी साच्यांचा सुद्धा वापर करावा लागतो. केक आणि त्याची सजावट या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, त्या दोन्हीसाठी अनेक पदार्थांची आणि त्याच्या योग्य सरमिसळीची गरज असते. या सगळ्यासाठी पुरेसा आणि त्याला लागतो तेवढाच वेळ देण्याची गरज असते.”
हे थीम केक्स बनविणे कुठल्याही संशोधनापेक्षा कमी नसते. ग्राहकाला काय अपेक्षित आहे हे नीट समजून घ्यावे लागते. केकची सजावट ही सुद्धा दोन पद्धतीची असते. एक जी फक्त शो पुरती, जी खाण्यायोग्य नसते आणि दुसरी जी फाॅण्डंट असते. म्हणूनच त्याची किंमत ही वेळ आणि मेहनतीची असते असे काही बेकर्सने सांगितले. थीम केक्सचा ट्रेंण्ड अचानक वाढण्याचे कारणं सोशल मिडीया आणि वाढणारी समारंभ संस्कृती आहे असं वाटतं.
फातेमा सांगते, “मला माझ्या ॲार्डर मिळतात तेव्हा लोकं गुगल वरून किंवा कोणाच्या तरी फोटो मधले केक पाठवून सांगतात की त्यांना असाच केक हवा आहे. इतरांनी अमुक एक पार्टी अशी केली मग आपणही ती तशीच पण जरा हटके पद्धतीने करावी असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे त्या समारंभाचे निमित्त जे असेल तीच केकची सुद्धा थीम होते.”
साखरपुडा आणि लग्नाला सुद्धा आजकाल मोठ्या प्रमाणात केक कटींग होताना दिसते. तसेच बेबी शोवरचा स्ट्राॅबेरी-ब्लूबेरी मिक्स फ्लेवर केक, लग्नाचे सहा महिना झाल्यावर हाफ सर्कल केक, पैठणी साडीच्या डिसाईनचा केक असे अंसख्य सर्जनशील पद्धतीचे केक आजकाल सहज पाहायला मिळतात. एखादी इमारत उभी करताना गृहशिल्पी जसा प्रथम ती कागदावर उतरवतो त्याप्रमाणे बेकर सुद्धा त्यांच्या केकची प्रतिमा आधी डोक्यात, मग कागदावर आणि मग आपल्या हातांनी साकारत असतात.
सोलशुगर बेकरी या बेकींग ब्रॅण्डची हेमांगी सहारे सांगते, ” मला जेव्हा ॲार्डर मिळते तेव्हा मी ग्राहकांशी अनेक गोष्टींवर बोलते ज्यातून त्यांना नेमके काय अपेक्षित आहे ते कळते. प्रत्येक केकला मी ग्राहकाच्या आवडी प्रमाणे इमोशनल टच द्यायचा प्रयत्न करते. विविध आकारांचे केक, थरांचे केक या प्रमाणे त्याचे रफ स्केच तयार करून बघते किंव्हा कित्येकदा ग्राहक स्वत: सुद्धा आकृती पाठवतात ज्यावर मी काम करते.” हेमांगी या आधी सेंट रेगीझ आणि इंडीगो डेली सारख्या हाॅटेल्स मध्ये कार्यरत होती आता तिने बेकींगचा स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय चालू केला आहे.
गेल्या काही वर्षातच या केक्सच्या लोकप्रियतेमध्ये झालेली वाढ या बद्दल शेफ अमेय सावंत सांगतो, “बेकरी प्राॅडक्ट्स म्हटले की लोकांना विशेषत: तरूणांना आकर्षण असते. आजची पिढी फास्ट लाईफ जगते ज्यात पार्टीज, सेलीब्रेशन्स हा त्यांच्या जगण्यातला अविभाज्य भागचं आहे. लाॅकडाऊनमध्ये एकमेकांना भेटणे शक्य नसल्यामुळे या अशा माध्यमातून ते नावीन्यपूर्ण काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच गेल्या काही महिन्यात तरूण बेकर्सने घरातल्या घरात हे व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात सुरू केले. ज्यांना आधीपासून बेकींगची आवड होती पण रोजच्या दिनक्रमामुळे शक्य होत नव्हते त्यांच्यासाठी आताचा वेळ ही सुवर्णसंधीच होती.
शेफ अमेय बांद्रा कुर्लाच्या ट्रायडेंण्ट मध्ये असिस्टंट हाऊसकीपर म्हणून कार्यरत आहे. तो पुढे असही सांगतो, “भाजीत मीठ राहीलं असेल तर वरून घालता येते पण केकचे तसे नसते. कृती करतानाच सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. केकची सजावट, आयसिंग या खूप नाजूक आणि वेळखाऊ प्रक्रिया असतात. केक तयार झाल्यावरही मोठे आणि महत्त्वाचे काम असते ते म्हणजे केकला हाताळणे आणि सांभाळणे. फुड इंडस्ट्री मध्ये सगळ्यात कठीण क्षेत्र हे बेकींगचे असते.”
हे थीम केक्स कमीत कमी एक किलो प्रमाणाचे बनवावे लागतात. पण घरातल्या घरात अगदी एखाद दोन जणांमध्ये सेलीब्रेशन असेल तर असा केक घेणं लोकांना शक्य नसते. त्यावेळी इंडीयन फ्यूजन डेझर्ट्सची मागणी असते. काजूकतली कपकेक्स, विविध फ्लेवरचे डोनट्स, मिनी ब्राउनी अशा अनेक प्रकारांना तरूणांची मागणी असते. राखी पौर्णिमा, मैत्रीदिन या निमित्तांना एवॅंजर थीम कपकेक, हॅरीपाॅटर कपकेक्स, फ्रेंण्डस सिरीज कपकेक्स, गुलाबजाम फ्लेवर मुस अनेकविध फ्यूजन डेझर्ट्सनी तरूणांच्या जीभेचे चोचले पुरविले.
सोलशुगर बेकरीने या डेझर्ट्सचे वीकेंण्ड सेल आयोजित केले होते ज्याला तरूणांनाकडून खूप मागणी होती. विशिष्ट वेबसिरीज आणि एनिमेशन कार्टून्सच्या फॅन्सकडून या कपकेक्सला खूप लोकप्रियता मिळाली. अगदी मोठे केक ज्यांना घ्यायचे नसतात पण सेलीब्रेशन सुद्धा थांबवायचे नसते त्यांच्यासाठी हे केकबाॅम्स आणि डेझर्ट्स योग्य निवड आहे.
सण समारंभांना सध्याच्या दिवसात मिठाईपेक्षा या फ्यूजन डेझर्ट्सची मागणी वाढली आहे असे एकंदर चित्र दिसते. या मध्ये रेग्यूलर पॅकींगपेक्षा त्यातही नावीन्य आणण्याचा तरूण होम बेकर्सचा प्रयत्न असतो. डेकोरेटीव जार मध्ये पॅक केलेले ‘जारकेक्स’,आईस्क्रिम केंडी आकारातले ‘केकसिकल्स’, ‘केकबाॅम्स’ दिसायला आणि सरप्राईज गिफ्ट द्यायलाही सुंदर वाटतात असं या बेकर्सचे मत आहे.
एखाद्याच्या हृदयात शिरण्याचा मार्ग पोटातून जातो असं म्हणतात. त्यात जर ही गोड मेजवानी असेल तर नक्कीच दिल खुश होईल. सध्याच्या परिस्थितीमुळे तरूणांचे काही खास दिवस, सण-समारंभ घरात बसूनच साजरे झाल्यामुळे त्यांना जरा हिरमुसायला झाले. पण या थीम केक्समुळे ते तेवढेच वेगळेपणाने अनुभवता देखील आले. लांब असलो तरी एकमेकांना केकच्या रूपात आवडते गिफ्ट देता आले ह्याचा आनंद अनेकांनी व्यक्त केला.