आरतीत तेवे माझ्या विज्ञान व्रताची समई

आकाशाचा रंग निळा का असतो? दिवसा तारे कुठे जातात? पावसाचं पाणी नक्की कुठुन येतं?  वेगवेगळे ऋतु नेमके कसे बदलतात? असे अनेक प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला लहानपणी पडत असतात. त्याची अनेक गंमतीशीर उत्तरं सुद्धा मिळतात. ती आपल्याच बालमनाने शोधलेली असतात किंवा इतर मोठ्या माणसांकडून मनाचं समाधान करण्यासाठी मिळालेली असतात. त्या वयात जी उत्तरं आपल्याला शोधता येतात ती आपण पटवून घेतो आणि जी मिळत नाहीत त्याला ‘चमत्कार’ असा शेरा देत पुन्हा आपल्या मनाचं समाधान करतो. म्हणूनच आपण जनसामान्य राहतो! ज्यांना हा प्रश्न सतत भेडसावत राहतो, त्याच्या खोलात जाऊन त्याचं चमत्काररूपी शास्त्र जे शोधतात त्यांचं आपण ‘वैज्ञानिक’ असं नामकरण केलं आहे. 

विज्ञान आहे म्हणून जग शाश्वत आहे आणि वैज्ञानिक आहेत म्हणून माणसाला दृष्टी आहे. गुरूत्वाकर्षण निरंतर काळापासून असेल पण ते जगमान्य आणि वैश्विक झालं ते भौतिकशास्त्रज्ञ ‘आयझॅक न्यूटनने’ सिद्ध केल्यावर! म्हणजेच काय तर हे सिद्धांत फक्त शास्त्रापुरते किंव्हा कालसापेक्ष नसतात. त्याला माणसाच्या बुद्धीची आणि स्वीकृतीची जोड असते. ते त्रिकालाबाधित सत्य सांगतात ज्याला तर्कशास्त्राची जोड असते. जगभरात सगळ्या वैज्ञानिकांनी आपल्याला चिकित्सक दृष्टी असावी असा आग्रह नेहमीच धरला. पण वास्तविक पाहता अशी दृष्टी आणि विज्ञानाचा योग्य तसा प्रचार ही एक चिंतेचीच बाब आहे. याच ध्यासाने साधारणत: १९८८ च्या काळात ‘जागतिक विज्ञान दिन’ उदयास आला. १९२८ साली भारतातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ भौतिकशास्त्रज्ञ ‘डाॅ. चंद्रशेखर व्यंकट रामन’ यांच्या रामन परिणामाची नांदी झाली आणि  २८ फेब्रुवारी १९३० साली त्यांच्या संशोधनाला भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. भौतिकशास्त्रात नोबेल किताब मिळवणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ होते. त्यांच्या सन्मानार्थ जगभर साजरा होणारा हाच दिवस म्हणजे ‘जागतिक विज्ञान दिवस’. 

जनसामान्यांपर्यंत विज्ञान योग्य पद्धतीने पोहोचावे, त्याचे संवर्धन व्हावे, वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा आणि देशात अधिकाधिक संशोधक, अभ्यासक निर्माण व्हावेत या सगळ्यासाठी प्रोत्साहन म्हणून विविध पद्धतीने या दिनाचे आयोजन केले जाते. दरवर्षी हा दिवस एका विशिष्ट थीमवर आधारित असतो. या वर्षीची थीम आहे ‘व्हूमन इन सायन्स’. पुरूषसत्ताक समाज जरी आता कालबाह्य झाला असला तरी अमूक एक क्षेत्र स्त्रियांसाठी नसतंच मुळी अशा अनेक सनातनी रूढी परंपरा अजुनही अस्तित्वात आहेत. याच पार्श्वभूमीवर सुखावणारं चित्र म्हणजे, महिला विज्ञानक्षेत्रात अटकेपार झेंडे लावताना आपल्याला दिसत आहेत. काही वर्षांपूर्वीच्या कल्पना चावला पासून ते आता ‘मुथय्या वनिता’ आणि ‘रितू करिधाल’ यांच्यापर्यंत स्रियांचे या क्षेत्रातील कर्तृत्व उल्लेखनीय आहे. ह्या कार्याला सलाम म्हणून, जिथे विज्ञानाची प्रकाशमय वाट अजुनही पोहोचली नाही त्या सर्व स्त्रियांचं सारथ्य म्हणून या वर्षीचा हा विषय अगदी सार्थ आहे. 

१९३४ साली डाॅ. सी. व्ही रामन यांनी ‘इंडियन ॲकॅडमी ओफ सायन्सेस’  ही संस्था सुरू केली. २००३ मध्ये आय ए एस ने ‘व्हुमन इन सायन्स’ हा प्रकल्प सुरू केला. स्त्रियांचे विज्ञानातील स्थान आणि सहभाग प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने हे सुरू झाले. या संस्थे मार्फत खास पॅनल नेमून स्त्रियांसाठी अनेक प्रकल्प आणि कार्य योजना राबविल्या जात आहेत. या पॅनलच्या अध्यक्षा आहेत ‘संध्या विश्वेश्वरीया’   

विज्ञान ही एक छत्रछाया असेल तर त्यात अनेक घटक विसावतात. अणुरेणुंच्या विळख्यात अडकवणारं भौतिकशास्त्र, संपूर्ण शरीराचा वेध घेणारं जीवशास्त्र, रासायनिक नातेसंबंध सांगणारे रसायनशास्त्र किंवा ग्रह ताऱ्यांचे विश्व समजावणारं खगोलशास्त्र. या एक न अनेक रंगरूपी विज्ञान क्षेत्रात स्रिया धडाडीने अविरत कार्य करत आहेत. प्रत्येक क्षेत्रात स्रियांचे कार्य हे प्रेरणादायी आहे. मंगळयान, चांद्रयान सारख्या जोखमीच्या मोहीमांमध्ये सिहीणींचा वाटा होता तो म्हणजे प्रकल्प संचालक एम् वनिता आणि मिशन डायरेक्टर रितू करिधाल. देशासाठी अत्योच्च महत्त्वाच्या मोहीमांची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. इस्रोमध्ये मंगळ मोहीमेसाठी एकूण आठ महिलांना महत्त्वाची जबाबदारी दिली गेली होती. 

कल्पनेपलीकडल्या अशा समृद्रशास्त्र विषयात सुद्धा नागपुरच्या ‘अदिती पंत’ यांनी गेले अनेक वर्ष अथांग अभ्यास केला आहे. त्या भारताच्या अंटार्टिका मोहिमेत सहभागी होत्या. जिथे प्रत्यक्ष अंटार्टिक खंडात जाऊन समृद्रशास्त्राचा अभ्यास करायचा होता. या कार्यासाठी त्यांना भारत सरकारच्या अंटार्टिका पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. 

‘डाॅ. सुनेत्रा गुप्ता’ हे रोगविज्ञानातले महत्त्वाचे नाव. मलेरिया, एच.आय.व्ही. सारखे रोग पसरण्यामागच्या कारणांचा अभ्यास त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. सध्या त्या ॲाक्सफर्ड विद्यापीठात कार्यरत असून साहित्य अकादमी पुरस्कारासह परदेशातील अनेक महत्त्वाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 

‘इंदिरा हिंदुजा’ हे स्त्रीरोगतज्ञान्यांमधील अदबीने घेतलं जाणारं नाव! भारतात टेस्टट्यूब बेबीची पद्धत यांच्यामुळे अगदी सहज आत्मसात झाली. या क्षेत्रात अनेक असामान्य विक्रम त्यांनी केले. २०११ साली भारत सरकारनकडून त्यांना पद्मश्री देऊन गौरविण्यात आले. 

अजून अनेक नावं या यादीत नमुद करण्यासारखी निश्चितच आहेत कारण महिलांसाठी आता काहीच अशक्य आणि अस्पृश्य राहिलेलं नाही. आर्टिफिशीयल इंटलिजंस सारख्या आधुनिक शास्त्रात सुद्धा स्त्रिया लीलया वावरताना दिसत आहेत. आश्चर्याची गोष्ट अशी की आधुनिक संशोधनाकरता लागणारे ह्युमनाॅइड प्रोटोटाईप सुद्धा  स्त्रीपात्री असतात. 

बंगळुरुच्या इंडस इंटरनॅशनल शाळेत रोबोट शिक्षिकेची परंपरा राबवली जात आहे. डिजीटल माध्यमांच्या काळात मुलांना शालेय अभ्यासात गोडी निर्माण करणं कठीण असतं म्हणून ही आर्टिफिशीयल इंटलिजंस शिक्षिका ते काम सहज सोपं करते.  मुलांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तिच्याकडे अगदी क्षणात मिळतात. हॅंसन रोबोटिक्स ने बनवलेली ‘सोफिया’ ही सुद्धा एक सोशल ह्युमनोइड आहे जी भारतात आणि जगभरात फिरून विज्ञान संचार करते.

इस्त्रोची ‘गगनयान मोहीम’ डिसेंबर २०२० साठी सज्ज होत आहे. परंतू माणसांच्या ही आधी तिकडची तांत्रिक परिक्षणाची जबाबदारी घेतली आहे एका स्त्री रोबोटने जिचे नाव आहे ‘व्योम मित्र!

 स्त्रीचे कुठलेही रूप शक्तीरूप असते हे इथे खऱ्या अर्थाने सिद्ध होते. 

‘कॅथरीन जाॅनसन्’ या अफ्रीकन- अमेरीकन ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गणिततज्ञ होत्या. साधारण ३५ वर्षापासून त्या नासा मध्ये परिभ्रमण विज्ञानतज्ञ म्हणून कार्यरत होत्या. त्यांना  या क्षेत्रातील भीष्मच म्हणावं लागेल. मुळत: अफ्रीकन असून वांशिक भेदभावा पलिकडे जाऊन त्यांनी अंतराळ क्षेत्रात असामान्य कार्य केले. २४ फेब्रुवारी रोजी वयाच्या १०१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. 

पुण्याच्या ए.आय.एस्.एस्.एम्.एस्. अभियांत्रिकी महाविद्यालयात विज्ञान दिवस आयोजित केला जातो. विविध विज्ञान संशोधनांचे नमुने, स्पर्धांचे आयोजन, व्याख्यान अशा विविध गोष्टींनी हा दिवस साजरा केला जातो. ‘स्मार्ट हेल्मेट’ हे विद्यार्थ्यांचे या वर्षीचे प्रोजेक्ट आहे. गाडीवर असताना हेल्मेट घालणे आता बंधनकारक असले तरी बऱ्याच प्रमाणात लोकांना अजुनही त्याचे गांर्भीय नसते. अशा वेळी या स्मार्ट हेल्मेटचे सेंसॅार असे असतात की तुमच्या डोक्यावर जर हेल्मेट नसेल तर गाडी चालू होणार नाही. दुर्दैवाने तुमचा अपघात जरी झाला तरी तुम्हाला ट्रॅक करत असलेल्या माणसाला तुमचे लोकेशन लगेच कळेल.  विज्ञात क्षेत्रातल्या टी आय एफ आर, जी एम आर टी तसेच अशा अनेक संस्था आणि महाविद्यालयात विज्ञात दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. या दिवशी खास जनसामान्यांसाठी या संस्था खुल्या असतात. शालेय विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा दिवस पर्वणी ठरतो. विविध संशोधनात्मक विषय त्यांच्याकडूनही हाताळले जातात. 

स्त्री- पुरूष भेदभाव हा वादंग समाजात काही नविन नाही. विज्ञान क्षेत्रात सुद्धा कमी- अधिक प्रमाणात पाहायला मिळतो. हा भेदभाव सांगून त्याला विज्ञानाचे दाखले जोडणारे सुद्धा आपण पाहतो.  परंतू स्त्री ही मानवी जीवनाचे उगमस्थान आहे हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही. तिच्या शिवाय जीवनचक्र चालू राहू शकत नाही आणि मानवी जीवनच अस्तित्त्वात नसेल तर विज्ञान तरी कसं टिकेल! विज्ञान हे सुद्धा एक शास्त्रशुद्ध, वस्तुनिष्ठ चक्रच आहे, आपल्या पूर्वग्रहातून निर्माण झालेले निष्कर्ष नव्हे! त्याच्या ही दोऱ्या नकळतपणे स्त्रीच्याच हातात आहेत. नवरसांप्रमाणे या विज्ञानरसातसुद्धा जणू स्त्रीचे अद्भुत रूप जगाला दिसते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish