आपल्या कलेला जितका भक्कम आणि समृद्ध असा सांस्कृतिक वारसा आहे तेवढीच समृद्ध आहे मराठी कलेची विनोदी शैली. दादा कोंडके, शरद तळवलकर पासून ते नंतर सगळ्यांचा आवडता लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, प्रशांत दामले, मच्छिन्द्र कांबळी, असं करत हास्यसम्राटांची ही यादी न संपणारी आहे. आता विविध भाषांमध्ये कॉमेडी शैलीची पाळंमुळं रुजलेली दिसली तरी याची सुरुवात मराठी मनोरंजन क्षेत्रापासूनच झाली.
त्याही थोडं मागे जाऊन अभ्यास करायचा ठरवलं तर मराठी साहित्य आणि विनोद या कल्पनेलाचं जन्म दिलेला देव- पु.लं देशपांडे यांच्यापाशी जाऊन सगळं थांबतं! पुलं देशपांडे म्हणजे देवाने मराठी साहित्य आणि आपल्या सगळ्यांना दिलेली शतकानुशतकाची एकमेव अमूल्य भेट आहे. विनोद हा इतका सहज आणि भावपूर्ण असू शकतो हे त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून त्यांनी दाखवलं. विनोदाला करायला आणि अनुभवायला वयाची सीमा नसते, शाब्दिक कोट्यांपासून ते तात्विक रसायना पर्यंत विनोद सगळ्यातच लपलेला असतो हे ही त्यांनी दाखवून दिलं.
या सगळ्यात मराठी संस्कृती स्थिरावलेली असताना, जगाच्या पातळीवर पपेट शो आणि मिस्टर बिन सारख्या माध्यमातून उदयास आलेली स्लॅप-स्टिक कॉमेडी ही सुद्धा विनोदाचा एक नवा अध्याय घेऊन आली.
सांगायचं मुद्दा हा की विनोद आणि मराठी भाषा किंवा मराठी संस्कृती हे घट्ट बांधलेलं समीकरण आहे. विनोदाच्या या सगळ्या प्रवासात तरुणाईला नव्याने सापडलेलं त्यांच्या खास आवडीचं स्टेशन म्हणजे स्टॅन्ड-अप कॉमेडी. तरुणांच्या ट्रेंड मधला स्टॅन्ड-अप कॉमेडी हा विषय फार खोल झाला आहे. हि फक्त एक कला किंवा छंद उरलेला नसून, तरुणाई याकडे करिअर म्हणून पाहत आहे. तरुणाईचा लाडका स्टॅन्ड-अप कॉमेडियन अनिश गोरेगावकर सांगतो, “
तरुणाईकडे विनोदाची निर्मिती करायला खूप विचार आहेत, पण ते ऐकायला तेव्हा फारसं कोणी नसतं. स्टॅन्ड-अप कॉमेडी हा विषय भारतात सध्या फक्त मनोरंजन म्हणून मर्यादित आहे परंतु त्याच्या पलीकडे एक व्यक्ती त्याच्या आयुष्याचा दृष्टिकोन तुमच्यापुढे मांडत असतो. तो त्याची विचार शैली मांडत असतो. हा एक विचार मला असा वाटतंय तरुणांना खूप भावतो कि आपलं जे म्हणणं आहे ते कोणीतरी ऐकतंय म्हणून आता मुलं या कडे करिअर म्हणून बघत आहेत असं वाटतं. २०१६-१७ च्या आसपास मराठी स्टॅन्ड-उप कॉमेडीला थोडं वलय मिळू लागलं कारण कलाकारांच्या छोटेखानी संस्था ओपन माईक चे आयोजन करू लागले. ओपन माईक हा प्रकार विशेषतः फक्त तरुणांसाठीच असायचा आणि विशेष म्हणजे ह्याला भरगोस प्रतिसाद मिळू लागला. तरुणांना अशा पद्धतीने आपली मत, अनुभव आणि विचार मांडणं आवडू लागलं. महाराष्ट्रात सध्या असे खूप तरुण आहेत जे नोकरी-शिक्षणासाठी आपल्या गावातून मुंबई-पुण्यासारख्या शहरात स्थायिक आहेत. त्यांना स्टॅन्ड-अप कॉमेडी खरंतर आपली व्यथा मांडण्याचा मंच वाटतो फक्त त्याला एक कॉमेडीची झालर दिली कि त्यात वेगळे पण येतो. यावरच अनिश सांगतो, “
“स्टॅन्ड अप कॉमेडी हा एक आरसा आहे, एकाद्या गीष्टींबद्दल आम्ही विनोद करतो आणि लोक हसतात कारण ती त्यांच्याशी सुद्धा संबंधित असते, त्यांचासोबतही ती घडत असते. असं सुद्धा बरेचवेळा होतं की मला एखादा वाईट अनुभव आलाय किंवा मी कुठल्यातरी थोड्याशा दुःखी भावनेत आहे तर आता मला असं वाटत कि चला आपल्या शोसाठी एक नवीन कन्टेन्ट मिळाला.”
आपण जे नेहमी म्हणतो कि तरुणाई कायम कार्यशील आणि प्रयोगशील आहे पण त्याही पलीकडे ते जे करतायेत ते लोकांना भावतंय ही भावना सुद्धा त्यांना महत्त्वाची वाटते विशेषतः स्टॅन्ड-अप कॉमेडीच्या बाबतीत आपला ऐकून कोणीतरी हसतंय ही बाब फार समाधान देणारी आहे. स्टॅन्ड-अप कॉमेडी तरुणांना आवडण्यामागचं अजून एक मोठं कारण म्हणजे त्या मागे वैयक्तिक अभिरुची आहे. प्रत्येकाची कला ही एका विशेषणा खाली असली तरी त्याला स्वतःची शैली आहे. तरुणाई या व्यक्तिसापेक्षाबद्दल कायमचं आग्रही आहे हे आपल्याला माहीतच आहे.
विनोद ही जी शैली आहे ती म्हटलं तर फार सहज आणि म्हटलं तर भयंकर अवघड अशी गोष्ट आहे. विनोदाची निर्मिती करायला खरंतर फक्त बारीक निरीक्षणशक्तीची आवश्यकता असते. त्यात फार असं काही गूढ गुपित दडलेली नाही असंही अनेक तरुण स्टॅन्ड-अप कॉमेडियन सांगतात. त्यांना विशेष असा अभ्यास करावा लागतो तो म्हणजे क्राउड स्टडी. तुम्ही जिथे सादरीकरण करताय तो प्रेक्षकवर्ग नक्की कसा आहे, त्यांना काय आवडत, त्यांची काय अपेक्षा आहे, त्यांचा काय दर्जा आहे या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. विनोदी निर्मिती किंवा स्टॅन्ड-अप कॉमेडी करणं यामध्ये सुद्धा खूप लिखाण आवश्यक असतं म्हणून या अभ्यासाची गरज असते.
तुमच्या जवळच्या गोष्टीमधूनच विनोद निर्मिती करणं सोपं असतं हे सुद्धा एक निरीक्षण तरुणांचं आहे. तुमच्या जवळचे, तुमच्या मातीच्या जवळचे विनोद लोकांना जास्त भावतात आणि आकर्षित करतात. मराठी भाषा, मराठी तरुण वर्ग आणि मराठी प्रेक्षक यांना जेवढी कलेची जण, आवड आणि नावीन्य आहे तेवढं जगाच्या पाठीवर कुठल्याच प्रेक्षक वर्गाला नसेल; कारण मराठी भाषा वळवावी तशी वळते, त्यामध्ये अनेक विशेष शब्द आहेत, विशेषणं आहेत, प्रत्येक प्रांताचा एक लहेजा आहे, विनोद निर्मिती या सगळ्यातून होते जी कमालीची सखोल आणि समृद्ध असते.
विनोदाचे आणि नाट्यभूमीवरचे विक्रमादित्य अभिनेते प्रशांत दामले यांनी सुद्धा एका मुलाखतीत नमूद केले होते, तुमचे शब्द आणि तुमचे हावभाव मिळते जुळते नसले कि विनोद निर्मिती होते. प्रेक्षकांना सुद्धा स्वच्छ आणि निखळ विनोद जास्त आवडतात.
फक्त आता प्रश्न एवढाच आहे कि स्टॅन्ड-अप कॉमेडी हा प्रकार अजूनतरी थोडा नवीन आणि तरुणाईच्या प्रयोगशीलते मधून निर्माण होणार आहे त्यामुळे त्याचे आशय-विषय अजून जास्तीत जास्त अभ्यासले जातील. तरुणाईचा सुद्धा कल याकडेच आहे.
समाजासाठी कॉमेडी किती महत्वाची आहे आणि समाजात विनोद या क्षेत्रामुळे काय काय बदल होतात हे विचारल्यावर अनिश सांगतो, ” कला समाज बदलते आणि समाज कलेला बदलतो. आपली कला जर लोकांना आवडली तर लोकं ते ऐकतात आणि तुम्हाला फॉलो करतात अशा प्रकारे कलेच्या माध्यमातून लोकं त्यांचे रोल मॉडेल सुद्धा निवडतात आणि ठरवतात. लोकं कलेच्या माध्यमातून आपली आणि पर्यायाने समाजचीच प्रगती करत असतात. अनेकदा असंही होतं कि एखादा नवीन विचार मांडला जातो, लोकांना तो आवडतो आणि लोकं तसं वागायला किंवा तो विचार आत्मसाद करायलाही लागतात.”
पुण्याची स्वीटी महाले ही सध्या नोकरी सोबत छंद म्हणून स्टॅन्ड-अप कॅामेडीचे शो करते. ती सांगत, “या क्षेत्रात मुलांचे दोन प्रकार आहेत. काहींना खरंच यात रस आहे आणि काहीतरी मोठं करून दाखवायचंय तर काहींना फक्त कूल दिसायचंय म्हणून ते स्टेजवर परफोम करत आहेत. स्टेजवर सादरीकरण करताना कुठल्या पद्धतीचा विनोद करायचा ह्याचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं असतं. कधी-कधी प्रेक्षकवर्ग जर थोडा बुजूर्ग वयाचा असेल तर स्क्रिप्ट लिहूनचं शो करावा लागतो कारण अगदी ट्रेंण्डी विनोद रिलेट होत नाहीत. तसंच काही विनोद हे फक्त निरीक्षणावर असतात. काही विनोद हे डार्क कॅामेडी मध्ये मोडतात.
हे क्षेत्र अजून पूर्णपणे प्रगत झाले नाही त्यामुळे आमच्यासारख्या मुलांना काहीतरी फिक्स इनकम मिळवूनचं ह्याचे शो करावे लागतात.”
ही कला आणि हे क्षेत्र तरूणाईला एका उंचीवर नेऊन ठेवायचे आहे. हिंदी आणि इंग्रजी मध्ये ही कला जासंत प्रचलित झाली आहे परंतू तरूणांचे असे म्हणवे आहे की विनेद या शैली उगम मराठीतूनचं झाला त्यामुळे मराठीत ह्याला जास्त वाव मिळायला हवा यासाठी ते प्रगतशील आहेत. स्टॅन्ड-अप कोमॅडी ही कला फक्त समाज नाही तर माणूस म्हणून सुद्धा तुम्हाला घडवत असतो.
आपल्याच व्यक्तीमत्वातले कितीतरी पैलू आपल्याला उलगडतात. सगळ्याच भावना आपल्यात अधिक संवेदनशील होतात.
तरूणपिढी या कलेद्वारे एक नवा अध्याय समाजात रूजवू पाहतेय. हे करताना ते थोड चूकतील, गडबडतील पण त्यांचा हेतू समाज घडविण्याचाच आणि समाज मोठं करण्याचा आहे.
ही कला तरूणांसोबत मोठं करायची जबाबदारी समाजाचीही आहे. स्टॅन्ड-अपचे शो सिनेमांसारखेच हाऊसफुल्ल करून ऐकून, पाहून निखळ आनंद घेण्याच काहीचं हरकत नाही.
आचार्य अत्रे सुद्धा त्यांच्या भाषणात बरेचदा म्हणायचे, तरूण वर्ग एकत्रित होऊन काहीतरी करत असेल तर समाजात क्रांती घडल्या शिवाय रहात नाही. अमर्याद उत्साह, अविरत श्रम आणि ज्वलंत भावना ही प्रत्येक पिढीतल्या तरूण वर्गाची ओळख आहे.
स्टॅन्ड-अप का जलवा
आपल्या कलेला जितका भक्कम आणि समृद्ध असा सांस्कृतिक वारसा आहे तेवढीच समृद्ध आहे मराठी कलेची विनोदी शैली.