आज नरकचतुर्दशी! अभ्यंगस्नान, मोती साबणाचा सुगंध, अंगाला तेल अगदी रगडणे, या सगळ्याची मज्जा काही औरचं असते! छान अंघोळ केली की नवीन कपडे घालून दारात पणत्या लावणे, आकाश कंदील आणि लायटिंगची आरास, भावंडांसोबत फराळ या सगळ्याने एक नवं चैतन्य आणि उत्साह येतो. दिवाळीत वेगवेगळ्या दिवसांसाठी साड्या आणि भेट-वस्तूंच्या खरेदीबद्दलचा आढावा आपण घेतलाच आहे.
साड्यांची लोकप्रियता असली तरी ड्रेसच्या फॅशन आणि ट्रेंड ला काहीच तोड नाही. ज्यांना साड्यांचा कधी कधी कंटाळा येतो किंवा काही चेंज हवा असतो त्या वेळी एथनिक ड्रेसेस अतिशय उत्तम पर्याय आहे. ते आरामदायक, कॅरी करायला सोपे, वेगवेगळ्या व्हरायटीत येतात आणि साडीसारखेच अगदी घरच्या समारंभाला सुद्धा भरजरी वाटतात. अशा गोष्टी असल्यामुळे साड्यांचा हंगाम चालू असला तरी ड्रेस काही अजून बाजारातून हद्दपार झालेले नाहीत.
एथनिक ड्रेसच्या व्हरायटी भुरळ पडणाऱ्या आहेत. एरवी जिन्स, स्कर्ट घालणाऱ्या तरुणी दिवाळीत अगदी आवडीने या सगळ्या व्हरायटी परिधान करताना आपल्याला दिसतात. एथनिक ड्रेसेस मध्ये सध्या मासी नाहीतर क्लासी फॅशन चालू आहे. म्हणजेच एकाच पद्धतीचे ड्रेस मुलींच्या अंगावर किंवा दुकानातही फारसे पाहायला मिळणार नाहीत. वैविध्यता, नावीन्य आणि फॅशन याचा एक अनोखा संगम एथनिक ड्रेसच्या ट्रेंडमध्ये पाहायला मिळतो.
पंजाबी, अनारकली, पारंपरिक गाऊन, प्लाझो ड्रेस, स्कर्ट-टॉप, लॉन्ग कुर्ता अशा विविध ट्रेंड्स गेल्या ५-१० वर्षात आपण अनुभवल्या. खरंतर एथनिक ड्रेस हा इतका भव्य मुद्दा आहे की तुम्ही कराल ती स्टाईल इथे असते आणि सामावली जाते. त्यामुळे नेमकी कुठली स्टाईल ट्रेंडिंग आहे हे इथे नमूद करणे कठीण आहे. म्हणूनच स्टाईल्स पेक्षा आपण ट्रेंडचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. मग या ट्रेंड मध्ये ड्रेसचे कापड, रंग, लोकप्रियता, किंमत, उगम या सगळ्याच गोष्टी पारखणे महत्त्वाचे आहे. त्याचाच हा थोडाफार आढावा:
हल्लीच्या एथनिक ड्रेसमध्ये कोणते कापड जास्तीत जास्त वापरले जाते?
अगदी सध्या छोट्या ठेल्यासारख्या दुकानांपासून ते अगदी भारतीय आणि परदेशातल्या डिझायनर्स पर्यंत कॉटन, सिल्क, हातमाग, चंदेरी अशा थोड्या बेसिक आणि इलाईट याचे समीकरण असलेल्या कापडाचा वापर केला जातो. कॉटन हे फार कमी लेखले कापड आहे, गेल्या ५ वर्षात कॉटन कापडाचा चेहरा-मोहराचं बदलवून टाकल्याने तरुणांना ते परत आवडू लागले आहे. कॉटन मध्ये जो आरामदायीपणा आहे तो जगभरात कुठल्याही कापडात तुम्हाला मिळू शकत नाही. सिल्कमध्येही आता अगणित प्रकार उपलब्ध आहे परंतु पिव्हर सिल्क म्हणजे रेशीमचा वापर पुन्हा एकदा वाढलेला दिसतो कारण लोकं कस्टमाइज्ड कपडे बनवून घेतात. मग ते दिवाळीत आणि सणावाराला असूदेत नाहीतर लग्न-समारंभाला. हल्लीच ट्रेंड झालेले कापड म्हणजे चंदेरी. हे सुद्धा तसे वजनाला हलके असल्याने दिवाळीत बाजारात अगदी सहज दिसेल. चंदेरी हा प्रकार सिल्क आणि कॉटनच्या समीकरणाने बनतो. यामध्ये पेस्टल रंगाचा ट्रेंड अधिक पाहायला मिळतो.
कस्टमाइज्ड हा ट्रेंड जसा लोकप्रिय झाला तसं पुन्हा एकदा हातमागाच्या लोकप्रियता आली. सोप्या भाषेत सांगायचं तर हॅन्डलूम फॅब्रिक जे कुठल्याही प्रकारच्या विद्युत सेवेचा वापर नकरता संपूर्ण हाती विणलेले असते. हे काड जास्तकरून साड्यांसाठी वापरले जाते परंतु खास सणासाठी तुम्ही याचा ड्रेसही करून घेऊ शकता.
कुठले रंग घ्यावेत?
तास बघायला गेलं तर हा सुद्धा प्रत्येकाच्या आवडी-निवडीचा प्रश्न आहे. तरुणांमध्ये वैयक्तिकरण हा एक मुद्दा असल्याने रंग, स्टाईल या बद्दल प्रत्येक वेगवगेळी मतं असतात परंतु तरीही ट्रेंड बघायला गेलं तर पेस्टल रंगाचीच ट्रेंड दिसतो. तुम्ही कुठल्या समारंभासाठी कपडे निवडताय यावर सुद्धा रंगाची निवड अवलंबून असते. भारतीय संस्कृतीत लाल, डाळिंबी, मरून, केशरी, सिंदुरी लाल असे रंग सण -समारंभात, लग्न-सराईत परिधान केले जातात. त्यालाच अजून कॉम्प्लिमेंटरी रंग म्ह्णून मोरपंखी, जांभळा, निळा, पिवळा, हिरवा हे रंग सुद्धा वेगवेगळ्या समारंभाला दिसतात. आता पेस्टल रंग म्हणजे बेबी-पिंक, आकाशी, पोपटी, पीच अशा रानगनची चालती आहे. अर्थात सोशल मीडिया आणि सिने-इंडस्ट्रीचा परिणाम रंग-संगतीवर बऱ्याच प्रमाणात होत असतो. हेवी पंजाबी, अनारकली, लेहेंगा या मध्ये तुमच्या शरीरयष्टी प्रमाणे आणि स्किन-टोन प्रमाणे रंग निवडणे योग्य आहे.
अशा कपड्यांवर दागिने आणि मेकअप स्टायलिंग कसे करावे?
मिनिमलिस्टिक हा ट्रेंड सध्या तरुणाईत फार प्रचलित आहे. फार बटबटीत काही न घालता, नाजूक ज्वेलरीला मिनिमलिस्टिक ज्वेलरी म्हणतात. स्टेटमेंट ज्वेलरी म्हणजेच एखादीच काहीतरी मोठी, ठसठशीत ज्वेलरी ड्रेसवर घातली जाते. या स्टायलिंगसाठी तुम्ही अगदी डोळे झाकून सोशल मीडिया ट्रेंड्स, फॅशन स्टायलिस्ट, इन्फ्लुएन्सर्स अशांना फॉलो करू शकता. सहसा आजकाल सोन्याच्या म्हणजे खऱ्या दागिन्यांपेक्षा इमिटेशन, ऑक्सिडाइज्ड, सिल्व्हर अशा दागिन्यांना जास्त मागणी आहे.
असे कपडे शिवून घ्यावेत की रेडी-मेड घ्यावेत?
कपड्यांची फॅशन हे क्षेत्र कायमचं कॅलिटी ओव्हर कोन्टिटी या धोरणावर काम करतं. लोकांना चांगला दिसण्यासाठी आणि इतरांपेक्षा वेगळं दिसण्यासाठी कितीही पैसे मोजावे लागले तरी त्यांची तयारी असते. म्हणूनच तुम्हाला जे शक्य असेल ते, ज्याची तयारी असेल ते तुम्ही करू शकता. पारंपरिक गाऊन सारखे कपडे हे रेड-मेड जास्त स्वस्त आणि चांगले मिळतात कारण त्याची शिलाई खूप जास्त असते. आजकाल पंजाबी किंवा अनारकली ड्रेस सुद्धा फार युनिक आणि भरजरी रेड-मेड मधेच मिळतात. परंतु तुम्ही कस्टमाइज्ड करून घेत असाल किंवा एका विशिष्ट पद्धतीतच तुम्हाला ड्रेस हवा असेल तर तो शिवून घे जास्त संयुक्तिक ठरते. फॅशन डिझायनर कडून स्टाईल करून घेत असाल तर शुवण्याशिवाय पर्याय नाही. जुन्या साडीचा ड्रेस हा प्रकार सुद्धा आता तरुण मुलींमध्ये फार लोकप्रिय झाला आहे. अशा पद्धतीने तर तुम्ही अगणित आणि अमर्याद नावीन्य प्रकार शिवून घेऊ शकता.
एथनिक ड्रेस स्टाईल करताना काय काळजी घ्याल:
- अति टाईट कपडे शिवू नका किंवा रेडी-मेड घेऊ नका- ह्याने तुमचा बॉडी-टाईप चांगला असला तरी संरुन दिसताना ते चांगलं दिसत नाही किंवा छान फॅशनेबल दिसत नाही. एक साईझ अप किंवा थोडा लूज असेल तर जबड्याला आणि तुमच्या दिसण्याला सुद्धा एक छान फ्लो येतो.
- प्रत्येक ड्रेसच्या खाली लेगिंग्स घालणे टाळा- ५-१व वर्ष पूर्वी लेगिंग्स चा एक ट्रेंड आला आणि चुडीदार सलवार कमीज चे मार्केट कायमचे बंद झाले. परंतु चुडीदार नको असेल तर वेगवेगया पद्धतीच्या पँट्स, प्लेझझो, बॉटम्स बाजारात मिळतात ज्याने तुमचं ड्रेस स्टायलिंग अगदी उठून दिसेल.
- कुर्त्याची लेन्थ फार महत्वाची- थोडा छोटा किंवा शॉर्ट कुर्ता आणि अगदी पायाच्या तळव्यापर्यंत लेगिंग हे कॉम्बिनेशन अतिशय वाईट दिसते. लॉन्ग किंवा शॉर्ट कुठलाही कुर्ता असेल तरी हल्ली अंकल लेन्थ लेंगिन्ग्स, पँट्स मिळतात त्याच शक्यतो घाला. अगदीच पायघोळ अनारकली असेल तरच फुल्ल-लेन्थ लेगिंग्स चांगली दिसते.
- ओढणी फार महत्त्वाची- आजकाल इतक्या अप्रतिम ओढण्या बाजारात आल्या आहेत की हल्ली कुर्ते आणि संपूर्ण ड्रेस फार बेसिक असतात पण फक्त ओढण्यांमुळे ड्रेस खुलून दिसतो. वेगळ्या फक्त ओढण्या सुद्धा हल्ली विकत मिळतात. ड्रेसवर तुम्ही ओढणी कशी घेताय ह्याने तुमची फॅशन समकालीन आहे की आऊटडेटेड ते कळते. ह्यासाठी तुम्ही फॅशन इन्फ्लुएन्सर्सना (चांगल्या दर्जाचे) नक्की फॉलो करा.
- ड्रेसवर हेअरस्टाईल फार महत्त्वाची- फॅशन इन्फ्लुएन्सर्सचे असे म्हणणे आहे की मुली सगळं छान अगदी अप-टू-डेट स्टायलिंग करतात परंतु हेअर-स्टाईल या गोहस्तीला फार कमी लेखतात. त्यावर खरंच तुमचा लूक फार अवलंबून असतो. चेहऱ्याची ठेवणं, ड्रेसचा प्रकार आणि शरीरयष्टी ह्याला साजेशी हेअर-स्टाईल फार महत्त्वाची असते.
- ड्रेसवरही दागिने फार महत्वाचे- साड्या नेसताना अगदी कटाक्षाने आपण दागिन्यांची निवड करतो, ड्रेसवर आपण फार लक्ष देत नाही. ते चूक आहे. ड्रेसवर दागिने जेवढे खुलून दिसतात तेवढे ते इतर पोशाखावर छान दिसत नाहीत. ड्रेसवर कसे दागिने घालायचे ते सुद्धा ड्रेसचा प्रकार, रंग, तुमचा स्किन-टोन, ड्रेसचा आवाका म्हणजे किती भरजरी आहे यानुसार थोडा विचार करून घालावे.
- बॅग/पर्स/क्लची निवड योग्य असावी- ड्रेसवर पर्स हा मुद्दा पण फार महत्वाचा आहे. थोडं क्लासी लूक साठी टोट बॅग, क्लच किंवा अगदी छानशी छोटी पर्स जी फार घोळदार, जड नसेल तर ड्रेस आणि तुमचा लूक उठून दिसतो.
- चप्पल चांगली निवडा- मोजडी, जुती, देखण्या फ्लॅट्स, पारंपरिक हिल्स हे प्रकार एथनिक ड्रेसवर फार छान दिसतात. चप्पल सुद्धा तुमची उंची, ड्रेसच्या सलवारची उंची यानुसार योग्य ती निवड.
- नाजूक प्रिंट्सचे ड्रेस निवडा- आता प्रत्येक कापडाचे अनारकली, स्ट्रेट फिट, ए -लाईन स्टाईलचे कपडे शिवून किंवा रेड-मेड सुद्धा मिळतात. अशावेळी प्रिंट्सचे ड्रेस निवडताना नाजूक, छोटे किंवा माध्यम खर्च प्रिंट्स निवडावे म्हणजे मुलींच्या शरीरयष्टीला छान दिसतात तसेच तुम्हाला स्टायलिंग करताना भरपूर वाव मिळतो.
या सगळ्यामध्ये एक विषय वेगळा नमूद करायची गरज नाही तो म्हणजे हलका मेक-अप. अगदी बेसिक काजळ, टिकली आणि लिपस्टिक एवढं केलात तरी अगदी सुंदर दिसू शकता. कपड्यांची फॅशन हा विषय एका चक्रव्यूहासारखं आहे, जो आत जाईल तो अजून अजून गुंतत जातो. साधा, सिम्पल वाटणारा पंजाबी ड्रेस सुद्धा तुम्ही थोडे समकालीन फॅशन ट्रेंड्स फॉलो केलेत तर अगदी रिच दिसेल. अजून लक्ष्मी पूजन, पाडवा, भाऊबीज हे खास दिवस बाकी आहेत. यातल्या टिप्स आणि ड्रेसचे प्रकार नक्की ट्रे करून बघा तुमचा लूक अगदी क्लासिक आणि एलिगंट दिसेल.