
दै. लोकसत्ता मध्ये दि. १६/१/२०२६ रोजी प्रकाशित
मकरसंक्रांतीच्या दिवसात आकाशात रंगीबेरंगी पतंग झळकू लागले की, घराघरांत एक वेगळीच उत्साहाची लहर पसरते. पिढ्यान्पिढ्या चालत आलेली पतंग उडवण्याची ही परंपरा केवळ खेळ नसून, ऋतुचक्रातील बदलाचे आणि उत्तरायणात सूर्याच्या स्वागताचे प्रतीक मानली जाते. पूर्वी सकाळी लवकर गच्चीवर चढून पतंगाची गुंडाळी नीट करणे, वडीलधाऱ्यांकडून मांज्याची खबरदारी शिकणे आणि आकाशाकडे डोळे लावून ‘काय पो छे !!’ चा जल्लोष करणे— या साऱ्या गोष्टी आजही होतात फक्त त्याला आता तरुणाईने काईट-फेस्टिव्हल सारखे भव्य स्वरुप दिले आहे.
धार्मिक मान्यतेनुसार पतंग उडविण्याची परंपरा २००० वर्ष जुनी असू शकते असे म्हटले जाते. अशाही काही कथा आहेत ज्या सांगतात कि सगळ्यात पहिला पतंग श्री रामाने उडविला होता आणि तो इतका उंच उडाला कि थेट स्वर्गलोकापर्यंत जाऊन पोहोचला. नंतरच्या काळात मुघलांचा वेळी पतंग उडविणे हा महत्वाचा विरंगुळा असायचा आणि पुढे हळू हळू हा प्रकार लोकांच्या सणाचा भाग झाला. वैज्ञानिक अनुषंगाने पतंग उडवायचे कारण म्हणजे मकरसंक्रांती नंतर दिवस तिळा तिळाने वाढतो, वातावरणातील उष्णता वाढते, थंडी कमी होते. पतंग उडवताना उन्हं अंगावर घेणे होते, शारीरिक हालचाल होते आणि या वातावरण्यात शरीराला ती गरजेचीही असते.
पूर्वी संक्रांतीच्या एक-दोन दिवसांपुरता मर्यादित असलेला हा खेळ, आज अनेक दिवस चालणारा उत्सव बनला आहे. घरच्या गच्चीपुरती मर्यादित असलेली पतंगबाजी आता सोसायटी स्तरावरील स्पर्धा, मित्रमंडळींचे ग्रुप सेलिब्रेशन आणि सार्वजनिक मैदानांवरील पतंग महोत्सवांपर्यंत पोहोचली आहे. पारंपरिक साध्या पतंगांबरोबरच आता आकर्षक रंगसंगती, कलात्मक डिझाइन्स आणि थीम-बेस्ड पतंगांची चलती वाढताना दिसते. सुरक्षितता आणि पर्यावरण याबाबतची जाणीवही वाढली असून, काचमांज्याऐवजी इको-फ्रेंडली दोऱ्यांकडे नव्या पिढीचा कल वाढतो आहे. सोशल मीडियावर पतंग उडवतानाचे क्षण शेअर करण्यापासून ते नव्या ट्रेंड्सना स्वीकारण्यापर्यंत, आजची तरुणाई या परंपरेला आधुनिक रूप देत आहे.
पुण्यातील सगळ्यात मोठा काईट फेस्टिवल म्हणजे ‘स्कायबर्स्ट संक्रांती काईट फेस्टिव्हल ‘ इथे फक्त पतंगबाजी करणे नाही तर लहान मुलांचे अनेक उपक्रम, पतंग बनवणे, लहानाची पतंगबाजी, विविध प्रकारच्या पतंगांची विक्री, मोठं-मोठ्या महाकाय पतंगाचे प्रदर्शन, LED रात्रीच्या पतंग शो असे अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी इथे पाहायला मिळतात. याच बरोबर पारिवारिक खेळ, जत्रेसारखे पाळणे, म्युझिक फेस्टिव्हल, फूड-स्टॉल्स, हे सगळं सुद्धा आयोजित केलेलं असतं. खराडी आणि वाघोली भागात दरवर्षी याचे आयोजन केले जाते. या ४ दिवसात इथे संपूर्ण पुण्यातले तरुण अगदी दिमाखात या काईट फेस्टिव्हलच्या आनंद घेताना दिसतात. तसेच भूगाव भागात या स्काय फुल्ल ऑफ काईट्स हा महोत्सव आयोजित केला जातो. हा फेस्टिव्हल मुख्यतः लहान मुलांसाठी असतो जिथे मॅजिक शो, बब्बल शो, स्टोरी टेलींग या स्पर्धा असतात. तसेच भरपूर नाविन्यपूर्ण भेट-वस्तू, फॅमिली फोटोबूथ याही गोष्टी इथे असतात. साधारण १० तारखेपासून ते १५ तारखेपर्यंत पुण्याच्या अवकाशात रंगीबेरंगी पतंगबाजी मनमोहक पाहायला मिळते.
मुंबईमध्ये यंदा फार मोठे अधिकृत पतंग महोत्सव आयोजित झाले नसले तरी बऱ्याच भागांमध्ये सामुदायिक कार्यक्रमांत तरुण आणि कुटुंब एकत्र येऊन पतंगबाजी करताना दिसतात. युवक आज पतंग उडवण्याच्या परंपरेला इको-फ्रेंडली विचार, क्रिएटिविटी आणि सामूहिक अनुभव या नवीन ट्रेंडसह जोडत आहेत. पारंपरिक ‘मांज्याऐवजी सेंद्रिय दोऱ्यांचा वापर’ करणे, थीम-आधारित कलात्मक पतंग बनवणे, कापडापासून पतंग बनवणे, प्लॅटिकचा वापर टाळणे या सगळ्या अनुषंगाने तरुण आता सण साजरे करत आहेत. तरुणांचा कुठलाही उत्सव सोशल मीडियाशिवाय अपूर्ण आहे. फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणे, रील्स बनवणे, विविध सोशल क्लब, ग्रुप्स, यातून स्पर्धा घेणे, असे फेस्टिव्हल आयोजित करणे या समाजीकरणाच्या पद्धती तरुणांची सण साजरे करण्याची व्याख्या बनली आहे.
थोडा व्यापक विचार केला तर संक्रांतीचा सण हा भारताच्या बहुतांश राज्यात लोहरी, पोंगल, बिहू म्हणून वेगवगेळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तरुणांना ही सांस्कृतिक विविधता किंवा आजच्या भाषेत कॉस्मोपॉलिटन कल्चर आकर्षित करते. त्यांना आपल्या परंपरेसोबतच इतर परंपरा आणि आधुनिक नावीन्यतेने सण साजरे करायला आवडतात. अशा महोत्सवांमधून हा दृष्टिकोन साध्य होतो.
पतंगबाजी महाराष्ट्रापेक्षा गुजरात आणि तिथल्या भागांमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळते. २०२६ मध्ये केवळ एक पारंपरिक सण म्हणून नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित होणारा एक आकर्षक महोत्सव म्हणूनही ओळखला जातो. उत्तरायण हे मकरसंक्रांतीच्या दिवशी साजरे केले जाते आणि संपूर्ण राज्यभर विविध शहरांमध्ये त्याची भव्य रितीने तयारी सुरू असते. या वर्षी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव-२०२६ हे १० ते १४ जानेवारी दरम्यान आयोजित केले गेले, यात अनेक देशांचा विशेषतः जपान, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया दरवर्षी सहभाग असतो. जे पारंपरिक भारतीय पतंगबाजांसोबत विविध आकार, कलात्मक डिझाईन्स आणि तकनीकी कौशल्यांची झलक दाखवतात.
गुजरातमधील उत्सवांची ट्रेंडिंग आणि आकर्षक बाजू म्हणजे यापुढे ते केवळ एक स्थानिक परंपरा नाही. त्यांचा सामाजिक, सांस्कृतिक, पर्यटक आणि युवा मनोरंजनात्मक पैलूही समृद्ध झाला आहे. उदाहरणार्थ, जुन्या शहरात काही समुदायांनी प्रिमियम टेरेस अनुभव व्यवस्थापित केले, जिथे गट किंवा कुटुंब एकत्र येऊन संपूर्ण दिवसासाठी पतंग उडवण्याचा अनुभव घेत आहेत — हे केवळ खेळ नाही तर एक आधुनिक सामाजिक अनुभव म्हणून विकसित झाले आहे.
युवा वर्गासाठी हे महोत्सव फक्त पतंग उडवण्याचे स्थान नसून कलात्मकता, फोटोग्राफी, सोशल मीडिया कंटेंट, पर्यटन, आणि सांस्कृतिक विनिमयाचे व्यासपीठही बनले आहे. अनेक विद्यार्थी, ट्रॅव्हल ब्लॉगर्स आणि सामाजिक माध्यमावरील क्रिएटर्स २०२६ मध्ये उत्तरायण आणि इंटरनॅशनल काईट फेस्टिव्हलच्या अनुभवांची वैश्विक दर्शकांसमोर शेअर करीत आहेत.
पतंगबाजीच्या ट्रेण्डमधील एक विशेष मुद्दा म्हणजे पतंग बाजार. संक्रांतीच्या दिवसात या पतंग बाजाराची भरपूर चलती असते. पुणे मुंबईत ठरलेल्या काही भागांमध्ये हे बाजार पाहायला मिळतात पण ती त्या ऋतु पुरती साधी विक्री असते. उत्तर भारतात आणि गुजरातमधील पतंग बाजार हा पतंग व्यवसायाचा सर्वात विस्तृत आणि ऐतिहासिक बाजार मानला जातो, जिथे हजारो लोक आणि व्यापारी संक्रांतीच्या आठवड्यात २४ तास बाजार चालू ठेवतात आणि सागरी बाजूने मोठ्या प्रमाणात पतंगांची खरेदी–विक्री होते. अन्य प्रांतांमध्येही उदयपूर, जोधपूर, सूरत, राजकोट, हैदराबाद सारख्या ठिकाणी पतंग बाजार सणाच्या काळात सर्वाधिक गजबजलेले दिसतात, जिथे स्थानिक कारागीर तडका, भवरा, पावणा आणि आधा यांसारखे पारंपरिक डिझाइन्ससह नवीन शैलींचे पतंग सादर करतात.
गच्चीवरून आकाशाकडे नजर लावून पतंग उडवण्याची जी परंपरा कधी कुटुंबापुरती मर्यादित होती, ती आज शहरांमधील सार्वजनिक महोत्सव, युवकांच्या उत्साहपूर्ण सहभाग आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक उत्सवांपर्यंत विस्तारली आहे. पुणे-मुंबईतील स्थानिक पतंग बाजार, तरुणाईला आकर्षित करणारे सोसायटी-स्तरीय उपक्रम, आणि गुजरातमधील भव्य उत्तरायणसारखे महोत्सव—या साऱ्यांनी मिळून पतंग उडवण्याचा सण नव्या अर्थाने समृद्ध केला आहे. तरीही, या बदलत्या रूपामध्ये मूळ संस्कृतीचा गाभा अबाधित आहे—सूर्याचे स्वागत, ऋतुबदलाचा उत्सव आणि सामूहिक आनंदाची भावना. २०२६ मध्ये पतंग उडवणे हा केवळ एक खेळ राहिलेला नसून, तो परंपरा, बाजारपेठ, युवा ऊर्जा आणि सामाजिक सहभाग यांचा सुरेख संगम ठरतो आहे. आकाशात उडणाऱ्या प्रत्येक पतंगासोबत आपली संस्कृतीही नव्या उंचीवर झेपावत असल्याचा अनुभव आजचा पतंगोत्सव देतो.
