संक्रांतीचा गोड शृंगार

दै. लोकसत्ता  मध्ये दि. ९ /१/२०२६ रोजी प्रकाशित 

नवीन वर्षातला अगदी उंबरठ्यावरचा सण म्हणजे मकर संक्रांत. या सणाची शास्त्रातली गोष्ट म्हणजे ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवशी सूर्यदेवांचा उत्तरायणाचा प्रवास सुरू होतो. या बदलाला केवळ खगोलशास्त्रीयच नव्हे, तर आध्यात्मिक दृष्ट्याही अत्यंत शुभ मानले जाते. प्रकाश, उष्णता आणि सकारात्मक ऊर्जेची पुनरागमनाची ही सुरुवात असते.

मकरसंक्रांत म्हटलं की तिळगूळाचा गोडवा, पतंगांची रंगीबेरंगी गर्दी आणि “तिळगूळ घ्या, गोड गोड बोला” हा प्रेमळ संदेश आठवतो. पण गेल्या काही वर्षांत या सणाला आणखी एक खास झळाळी मिळाली आहे—ती म्हणजे हलवा दागिन्यांची. हलव्याच्या बांगड्या, चोकर , हेअर ऍक्सेसरीज , हार, कुंदन-डिझाईनमधले कानातले आणि अगदी साडीवर उठून दिसणारे हलवा सेट्स… परंपरेला आधुनिकतेचा हात धरून हलवा दागिन्यांनी मकरसंक्रांतीचा लूकच बदलून टाकला आहे.

एकेकाळी घराघरांत केवळ काळ्या दोऱ्यात तिळगूळ बांधून किंवा साध्या हलव्याच्या वड्या घालून संक्रांत साजरी केली जायची. आज मात्र हलवा दागिन्यांनी त्या परंपरेला नवा आकार दिला आहे. हे दागिने केवळ सणापुरते राहिले नसून, महिलांच्या संक्रांतीच्या पेहरावाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत.

डिझाईनमध्ये नवनवीन प्रयोग

आजचे हलवा दागिने केवळ चौकोनी किंवा गोल वड्यांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. काळानुसार आणि ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडीनुसार या दागिन्यांच्या डिझाइनमध्ये मोठे प्रयोग होताना दिसत आहेत. फुलांच्या पाकळ्यांसारखे मणी, कमळ, मोर, पानांच्या आकारातील हलवा पीसेस, कुंदन-प्रेरित हार, टेम्पल ज्वेलरीच्या धर्तीवर तयार केलेले सेट्स आणि मल्टी-लेयर नेकपीस हे सध्या विशेष लोकप्रिय ठरत आहेत. 

याशिवाय, हलवा-मणींच्या बांगड्या, कड्या, मंगळसूत्र-पॅटर्न हार, कानातल्यांचे मॅचिंग कॉम्बो आणि साडी-ब्लाउजशी रंगसंगती जुळवून तयार केलेले कस्टमाइझ्ड सेट्स ग्राहकांची पहिली पसंती बनत आहेत. काही कारागीर हलवा दागिन्यांमध्ये सुताचा दोरा, रेशमी धागे, ज्यूट, मखमली पट्टे किंवा हलकी सोनसळी कागदी सजावट वापरून त्यांना अधिक उठावदार रूप देत आहेत. फ्लोरल आणि हलवा ज्वेलरीचे कॉम्बिनेशन सुद्धा दिसायला रेखीव आणि सुबक दिसते.  बदलापूरच्या शर्व क्रिएशनच्या अपर्णा फडके सांगतात, “सध्या ग्राहकांची पसंती फ्युजन आणि थिम बेस्ड दोन्हीला आहे. ट्रेंडी डिझाईन्सला खूप मागणी आहे. पारंपरिक सेट सोबतच आधुनिक किंवा फ्युजन पद्धतीच्या दागिन्यांचे सुद्धा भरपूर डिझाईन्स मी बनवते.  मी २० वर्षांपासून दागिने बनवते, एवढे वर्षात मी २०-२५ नाविन्यपूर्ण आणि ट्रेंडी डिझाईन्स बनवले आहेत. तसेच नवीन डिझाईन्स बनविण्यासाठी साठी फॅशन ट्रेंड्स आणि परंपरा यातून प्रेरणा मिळत असते.” हे दागिने बनवविण्याची, टिकविण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते यावर त्या सांगतात, “हलवा दागिने बनवन्यासाठी प्रथम दागिन्यांचे पॅचेस बनवणे नंतर त्यांना हलव्याच्या  माळा जोडणे आणि मग फिनिशिंग करणे अशी प्रक्रिया असते. एक लेडीज फुल सेट बनवायला  दीड ते २ दिवस लागतात. आणि डिझायनर/ फ्युजन  सेट असेल तर ३ दिवस लागतात. “

घरगुती कलेपासून ट्रेंडपर्यंत

हलवा दागिन्यांचा प्रवास हा पूर्णपणे घरगुती कलेतून सुरू झाला. सुरुवातीला महिलांनी घरच्या घरी हलवा तयार करून, मण्यांसारख्या आकारात दागिन्यांत गुंफायला सुरुवात केली. हळूहळू या कलेला बाजारपेठ मिळाली. आज अनेक गृहउद्योग, महिला बचतगट आणि लघुउद्योजक संक्रांतीपूर्वी हलवा दागिन्यांच्या ऑर्डर्समध्ये गुंतलेले दिसतात.

सोशल मीडियाच्या प्रभावामुळे हा ट्रेंड अधिक वेगाने पसरला. इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप कॅटलॉग्स आणि ऑनलाइन प्रदर्शनांमधून विविध डिझाइन्स ग्राहकांपर्यंत पोहोचू लागली. परिणामी, हलवा दागिन्यांची मागणी केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता इतर राज्यांपर्यंतही वाढली आहे. आता मकर संक्रांतीच्या दिवसांमध्ये काही देवस्थानांमध्ये ही हलव्याच्या दागिन्यांचा वापर दिसतो. अपर्णा फडके यांनी २०२२ साली श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईला चक्क संपूर्ण हलव्याचा साज चढवला होता.  तरुणांसोबत लहान बाळांनाही या दिवसात हलवायचे दागिने घालून त्यांचा बोरन्हाण करतात. या साध्या परंपरेत  आता कमालीचे नावीन्य दिसून येते. लहान मुलींसाठी हलव्याचे फ्रॉक, चप्पल, पर्स असे प्रकार सुद्धा प्रचलित आहेत. अपर्णा यांनी कुरमुरे, शेवई आणि तिळाच्या हलव्यापासून काळी रेखीव साडी बनवली होती.  तरुण मुलांसाठी पण कंठी, अंगठी, थोडी लांबसर माळ, ब्रेसलेट असे अनेक प्रकार बनवता येतात. 

या ट्रेंडला  आणखी लोकप्रिय बनवण्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. संक्रांतीच्या दिवशी खास फोटोशूट्स, मित्रमैत्रिणींमध्ये ‘संक्रांत लूक’ स्पर्धा, इन्स्टाग्राम रील्स आणि स्टोरीजमधून हलवा दागिन्यांचे विविध डिझाईन्स झळकताना दिसतात. “फेस्टिव्ह पण ट्रेंडी” असा हा लूक तरुण पिढीच्या सौंदर्यदृष्टीला अगदी साजेसा ठरतो आहे.

तरुणाईसाठी सणाचा लूक आणि स्टाईल स्टेटमेंट

आजची तरुण पिढी संक्रांतीकडे केवळ धार्मिक विधी म्हणून न पाहता, कल्चर, फॅशन आणि सेलिब्रेशन यांचा संगम म्हणून पाहते. नऊवारी किंवा सहावारी साडी, नथ, चंद्रकोर, पारंपरिक दागिने, केसात मोगरा किंवा गजरा—आणि त्यासोबत हलवा दागिने असा संक्रांतीचा लूक सध्या विशेष ट्रेंडमध्ये आहे.

कॉलेजमधील संक्रांती कार्यक्रम, ऑफिसमधील एथनिक डे, हळदीकुंकू समारंभ आणि घरगुती फोटोशूट्स यासाठी हलवा दागिन्यांची खास मागणी वाढली आहे. सोशल मीडियावर #HalwaJewellery, #SankrantLook, #TilGulVibes अशा हॅशटॅग्सखाली शेअर होणारे फोटो आणि रील्स या ट्रेंडला अधिक चालना देत आहेत. काही तरुणी हलवा दागिन्यांचा वापर फक्त एक दिवसापुरता न ठेवता फोटोशूट किंवा व्हिडिओसाठी वेगवेगळ्या थीम्समध्ये करताना दिसतात. तसेच साड्यांचे विविध प्रकार, कुर्त्यांची स्टाईल्स, लेहेंगा चोळी अशा वेगवेगळ्या काळ्या पोशाखांमध्ये तरुणाईची संक्रांतीची तयारी असते. 

पर्यावरणपूरक विचारांची जोड

हलवा दागिने लोकप्रिय होण्याचं अजून एक कारण म्हणजे सस्टेनेबल फॅशन जी तरुणाईने गेल्या काही वर्षात बरीच उचलून धरली आहे. हलवा दागिने ही केवळ सौंदर्याची बाब न राहता, पर्यावरणपूरक विचारांचीही खूण बनत आहेत. प्लास्टिक, थर्माकोल किंवा कृत्रिम साहित्यापासून तयार केलेल्या दागिन्यांच्या तुलनेत हलवा दागिने नैसर्गिक, जैवविघटनशील आणि खाण्यायोग्य आहेत. सण संपल्यानंतर हे दागिने काढून ठेवले जात नाहीत किंवा कचऱ्यात फेकले जात नाहीत, तर प्रसाद म्हणून वाटले जातात किंवा खाल्ले जातात. आज सस्टेनेबल फॅशन आणि कॉन्शस कंझम्पशन याबाबत जागरूकता वाढत असताना, हलवा दागिन्यांचा वापर ही एक अर्थपूर्ण आणि जबाबदार निवड ठरत आहे—जी परंपरा आणि आधुनिक मूल्ये यांना जोडणारी आहे.

मकरसंक्रांतीचा खरा अर्थ गोडवा वाटण्यात आहे—तो तिळगुळात असो, नात्यांत असो किंवा अंगावर चढणाऱ्या हलवा दागिन्यांत. परंपरेला आधुनिकतेची किनार देत, हलवा दागिने हा सण अधिक रंगतदार, अर्थपूर्ण आणि संस्मरणीय करत आहेत.

गोडवा जपणारी ही परंपरा काळानुसार बदलते आहे, पण तिचा आत्मा मात्र तसाच आहे—तिळगूळ घ्या, गोड गोड बोला… आणि गोडच दिसा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *