लपवलेल्या काचा

संगीत क्षेत्रातलं हरहुन्नरी नाव म्हणजे डाॅ. सलील कुलकर्णी. बडबडगीतांच्या आशयापासून ते अगदी शाॅर्टफिल्म्सच्या संगीतापर्यंत लीलया वावरणारा बहुरंगी कलाकार. कलाकाराचा साचा बनवलेला नसतो. जिथे संधी मिळेल तिथे तो कलाकृती उभारू शकतो. मग ते वेगवेगळ्या माध्यमातुन का असेना. आपल्या बालगीतांच्या ठेक्यावर त्या जागी फिरवून आणणारा संगीत अवलिया जेव्हा ललित लेखनामध्ये मन रमवतो तेव्हा त्याला सुद्धा एक विशिष्ठ लय असते. काॅंटिनेन्टल प्रकाशनचं डाॅ. सलील कुलकर्णी लिखित ‘लपविलेल्या काचा’ हे पुस्तक म्हणजे लेखनातली एक मुशाफिरी. कलाकार हा आधी सच्चा माणुस असावा लागतो याची प्रचिती या पुस्तकातून येते. लेखकाला भावलेल्या काही व्यक्तींबद्दल, आयुष्यात येणाऱ्या अनुभवांबद्दल, स्वत:च्या सुक्ष्म निरीक्षणातून गवसलेल्या गोष्टींबद्दलच्या या कथा आहेत. 

या पुस्तकाचे मुखपृष्ठ रंगीबेरंगी काचांच्या झुंबरड्या सारखंच आहे. वेगवेगळ्या रंगांच्या चौकोनात असलेली लेखकाची प्रतिमा आपल्याला यांत दिसते. काचांसारखे पारदर्शक, बहुरंगी मन आणि अगदी पल्याडचंही स्वच्छ दिसावं अशी दूरदृष्टी… हा मतितार्थ असावा असे पुस्तक वाचून झाल्यावर जाणवते. प्रत्येक पुस्तकात वेगळेपण असतं. लेखनशैली, आशय, कथानक अशा अनेक गोष्टी, आपण पुस्तक का वाचावं ह्याला कारणीभूत असतात. या पुस्तकासाठी मला प्रकर्षाने जाणवलं ते म्हणजे लेखकाची लोकप्रियता. सलील कुलकर्णींची जी ओळख आपल्याला माहित आहे तीच शैली लेखनातून आपल्या समोर येते. काही कादंबऱ्या प्रथम पुरूषी असतात म्हणून आपल्या वाटतात, तसं या पुस्तकात लेखक स्वत:शीच बोलतोय असं वाटतं आणि इथेच आपलं मन खेचून घेतं. एखादा अभिनेता जेव्हा दिग्दर्शन किंवा निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकतो तरी त्याचा अभिनय मात्र कधी संपत नाही. तसंच या लेखनात सुद्धा सलीलच्या गाण्यातले सुरेल, तरल आणि निरागस भाव प्रत्येक शब्दात जाणवतात. संगीतातले सात सूर जसे एकत्र बांधलेले असतात तसंच हे लेखन आहे. 

यातली अजून एक गंमत म्हणजे प्रत्येक लेखाच्या आधी सलीलच्या अक्षरातला छोटं निवेदन आहे. ललित लेखनाला ती कल्पना खूप साजेशी वाटली. अंतर्मनाला हाक मारावी आणि जे उत्तर येईल ते लिहून काढावं असं या पुस्तकाचं लेखन आहे. कादंबरीत वाचकाला गुंतवणून ठेवणं तसं सोपं असतं कारण त्या कथेत अनेक पात्र, घटना यांचा सुसंवाद सतत चालू असतो. परंतू ललित लेखनात लेखकाचंच कसब असतं. तरल भाषा वहावत जाणार नाही याचं भान ठेवावं लागतं. हे कसब या पुस्तकात उत्कृष्टरित्या पेललं आहे. 

या कथा लेखकाच्या जिव्हाळ्याच्या आहेत म्हणून त्या वाचकालाही आपल्याशा वाटतात. या लेखनाची भाषा इतकी साधी सोपी आहे की दहा वर्षाच्या मुलापासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणही वाचू शकतात, समजू शकतात आणि त्यातला आनंद सुद्धा घेऊ शकतात. या गोष्टींमधून अनेक थोर व्यक्ती वाचकांना भेटतात. थोड्या वेळासाठी या व्यक्तींचं थोरत्व विसरून त्या आपल्यातल्याच आहेत असा सुंदर भास लेखनातून होतो. याचं उदाहरण म्हणजे या पुस्तकात असलेला शांता शेळके यांच्या बद्दलची गोष्ट. लेखकाने त्यांना आपल्या आईच्या वयाची आपली जवळची मैत्रीण असं म्हटले आहे. वाचून झाल्यावरही अनेक वेळा आपण त्यातले संदर्भ शोधण्यासाठी ते चाळत राहतो. या कथा वाचताना ललित साहित्यातलं प्रख्यात व्यक्तिमत्व ‘रविंद्र पिंगे’ यांच्या कथा नक्की आठवतात. अर्थात प्रत्येक लेखकाची लेखनशैली भिन्न असते यात वादच नाही. पण ललित लेखनाची भाषाच ओघवती असते की फुलपाखरांसारखे आपण प्रत्येक लेखनरूपी फुलात साम्य आणि वेगळेपण दोन्ही शोधायचा प्रयत्न करतो. ‘किती सांगायचंय, खूप भरभरून सांगायचंय पण नकोच.. असं होतंय काहीतरी…’ हे इतके सहज तरल भाव लेखकाने मांडले आहेत. यात दमलेल्या बाबाच्या कहाणी सारख्या अनेक गोष्टी मांडल्या आहेत ज्यामुळे नकळत डोळ्यांच्या कडा नकळत ओल्या होतात. ‘बाळाच्या जावळाचा स्पर्श होताच पंढरपुरच्या विठाईच्या पायाचा स्पर्श जाणवतो’ अगदी सहज तरल शब्दांमधून एवढे भावनिक पण तितकेच खोल विचार लेखकाने मांडले आहेत. 

पुस्तकाच्या नावाप्रमाणे लेखक स्वत:च्या आणि वाचकाच्याही मनातल्या लपवलेल्या काचा शोधायचा प्रयत्न करतो. 

लेखकाचं मन कलावंताचं आहे. लेखामध्ये भावनांचा कल्लोळ असला तरी विचारांचा तटस्थपणा आहे. साधारण वाचकांची अशी एक व्यथा असते की ललित लेख समजणं अवघड असतं. पण अशा वाचकांसाठी या पुस्तकापासून सुरूवात करणं सोयीचं आहे. यातले लेख समजू ही शकतात आणि त्याची गोडीही लागू शकते. कारण या पुस्तकातलं ललित लेखन रोजच्या जीवनातल्या आजबाजुला घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब आहे. कादंबरीची कल्पकता असते पण ललित लेखनाचा आशय वास्तववादी असला तरी भाषा अलंकारिक असते. 

या अलंकारातूनच वेगवेगळ्या भावना दाटून येतात. 

दहावीच्या वर्गात असताना विज्ञानाचं एक प्राॅजेक्ट असायचं, कॅलिडोस्कोप बनवण्याचं! त्यामध्ये काचांमधून निर्माण होणारी वेगवेगळी आकृती असते. दुर्बिणीसारखे बघून या आकृत्या आपल्याला दिसतात. हे पुस्तक अगदी तसंच आहे. 

डाॅ. सलील कुलकर्णी यांच्या संगीताचा बाज असलेल्या लेखनशैलीच्या आपण प्रेमात पडतो. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish