दै. लोकसत्ता मध्ये दि. १०/१/२०२५ रोजी प्रकाशित
थंडीतल्या सणांची एक वेगळी मजा असते; त्यातली फॅशन, पदार्थ, उत्सव, समारंभ सगळंच थंडीतले वातावरण लक्षात घेऊन केले जाते म्हणून त्यात इतर सणांपेक्षा वेगळेपण असते. याच थंडीतला नवीन वर्षातला पहिला सण येऊन ठेपलाय…. मकर संक्रांत! अगदी पुरातन काळापासून मकर संक्रांत या सणाला वेगवेगळ्या प्रकारे सांस्कृतिक महत्त्व आहे. पौष महिन्यात येणार हा सॅन म्हणजे सूर्याचा उत्सव मानला जातो कारण या दिवसांमध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश करतो; म्हणून मकर संक्रांत हे नाव. म कर संक्रांतीनंतर सूर्य उत्तरेकडे जातो व आपली पृथ्वी सूर्यापासून दूर म्हणजे वर जाते. यालाच उत्तरायण असे म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायणाचा आरंभ होतो.
सध्या वातावरण बदलांमुळे थंडी कमी-जास्त प्रमाणात असते परंतु पूर्वीच्या काळी मकर-संक्रांतीचा दिवस हा सगळ्यात थंड दिवस असायचा ज्यामुळे काळे कपडे घालण्याची पद्धत लोकांनी अवलंबवली कारण काळा रंग थंडीचा प्रतिकार करतो. असे मानले जाते की मकर संक्रांती हा सूर्याच्या मकर राशीत संक्रमणाचा पहिला दिवस असतो. या सणापासून दिवस तिळ-तिळ मोठा होतो. मकर संक्रांती हा एकमेव भारतीय सण आहे जो सौर चक्रानुसार साजरा केला जातो, तर बहुतेक सण हिंदू कॅलेंडरच्या चंद्र चक्रांचे पालन करतात. म्हणून, ते जवळजवळ नेहमीच दरवर्षी त्याच तारखेला येते कधी १४ जानेवारी तर कधी १५ जानेवारीला हा साजरा केला जातो.
भारताची संस्कृती इतकी संपन्न आहे की हा सण भारताच्या विविध भागांमध्ये फार सुंदर पद्धतीने साजरा केला जातो. भोगी, पोंगल, लोहरी, माघी अशा अनेक नावांनी हा सण ओळखला जातो.
बहुप्रचलित प्रथा ज्याची सुरुवात झाली गुजरात राज्यापासून पण आता जी मकर संक्रांतीला भारतभर पार पडली जाते ती म्हणजे पतंग उडवणे. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, या भागात पतंगबाजी खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवसानंतर शेतातली कापणी संपते, या दिवसानंतर थंडी सुद्धा कमी व्हाल लागते आणि दिवस मोठा होऊ लागतो. सूर्यदेवाचे स्वागत करण्याची ही पद्धत असते ती म्हणजे सकाळच्या स्वच्छ सूर्यप्रकाशात पतंगबाजी करणे.
भारताचा उत्तर-पूर्वेचा भाग निसर्ग आणि सांस्कृतिकसौंदर्याने परिपूर्ण आहे. मकर संक्रांतीच्या दरम्यान तिथे आणखी जिवंतपणा येतो. जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर, येथे राजस्थानी सुंदर बैठ्या घरांमध्ये सगळेच लोक आपापल्या गावंच्यावर जाऊन रंगीबेरंगी पतंगाने पतंगबाजीचा आनंद घेत असतात. हजारो रंगीबेरंगी पतंगांनी सकाळचे व्यापलेले अवकाश नजरेत भरून घ्यावेसे वाटते.
तिथेही तीळ आणि गुळापासून बनवलेले गोड़ पदार्थ खाल्ले जातात ज्याला पिन्नी असे म्हणतात, हा लाडूसाठी वापरला जाणारा पंजाबी शब्दप्रयोग आहे. यासोबतच डाळींची खिचडी तिथे फार मोठ्या प्रमाणात या दिवसात खाल्ली जाते. कारण तिथे थंडीचा पारा महाराष्ट्रापेक्षा भरपूर जास्त असतो.
पतंगबाजी करण्यात कोणाचाच हात न धरू शकणारे राज्य म्हणजे भारताच्या पूर्वेची राज्य आणि मुख्यतः गुजरात. गुजरातमधल्या अहमदाबाद येथे सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय पंतांगु उत्सव होतो जो ७ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत म्हणजे आठवडाभराचं सुरु असतो. हा भारतातील सर्वात प्रसिद्ध पतंगोत्सव आहे. पतंगबाजीच्या स्पर्धेसाठी जगभरातून लोक अहमदाबादमध्ये येतात. इथे फक्त घरांच्या छतावरचे पतंग दिसत नाहीत तर महाकाय बॅनर पतंग, उडणारे ड्रॅगन पतंग, रोक्काकू फायटर पतंग, असे आणखी नाविन्यपूर्ण पतंग दिसून येतात. इथे भाला मोठ्ठा पतंग बाजार असतो आणि या आठवड्यात २४ तास सुरू असतो. पतंगांच्या या राजधानीत पतंग विक्रीच्या स्टॉल्सच्या रांगा लागलेल्या असतात.
या उत्सवात पहाटे पाच वाजता पतंगबाजी सुरू होते आणि मध्यरात्रीपर्यंत चालते. गुजरात भागात मकर संक्रांतीला उतारायण म्हणून मुख्यतः समजले जाते.
इथे महाराष्ट्राप्रमाणे उंदियो आणि तिळगुळाची वाडी, लाडू असे पदार्थ केले जातात.
पतंग उत्साव बहुतांश प्रमाणात पूर्वेकडे आणि उत्तरेकडे साजरा केला जातो, दक्षिण आणि इतर भागातही हा सण विविध प्रकारे साजरा केला जातो आणि अतिशय अनोख्या प्रथा केल्या जातात’; त्या जाणून घेणे फार छान अनुभव असतो, चला जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या वेगवेगळ्या प्रथा:
भारताच्या दक्षिण भागाकडेही या सणासाठी जय्यत तयारी केली जाते. कर्नाटकात ह्याला सुग्गी म्हणतात. इथले शेतकरी आपली शेतं आणि गुरं छान सजवतात, रात्री शेकोटी करून त्या भोवती पारंपरिक गाणी म्हणतात. इथे उसाची शेती बरीच प्रमाणात होते तेव्हा इथल्या बायका तिळगुळासोबतच ऊस सुद्धा एकमेकींना वाटतात. महाराष्ट्रासारखेच इथेही नाव-विवाहित दांपत्त्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजिले जातात.
केरळ मध्ये ह्याला मकर विलक्कु म्हणतात. या दिवसात शबरीमाला मंदिराजवळ एक यात्रा आयोजित केली जाते जेव्हा हजारो लोकं मकर ज्योती हे अवकाश चांदणे पाहायला येतात जे आईयाप्पा स्वामींचा रूप आहे असे मानले जाते. इथे अक्ख्या भारतातूनच लोकं येतात.
पश्चिमबंगालच्या भागात पौष संक्रांत साजरी केली जाते कारण हा सण पौष महिन्यात येतो, बंगाली दिनदर्शिकेत सुद्धा पौष महिना असतो. इथे शेतकरी आपली घरं, शेतं यांची साफ-सफाई करतात, अंगणात रांगोळ्या काढतात, या रांगोळ्या तांदळाच्या पीठाने काढल्या जातात, घरात आंब्यांच्या डहाळ्यांनी छान सजावट करतात.
बिहार आणि झारखंडमध्ये संक्रांत सणात २ दिवस महत्वाचे मानले जातात, पहिल्या दिवशी, लोक नद्या आणि तलावांमध्ये आंघोळ करतात आणि या वर्षी चांगली कापणी झाल्यामुळे देवाचे आभार मानतात. इथेही मोठ्या प्रमाणात पतंगबाजी केली जाते.
दुसरा दिवस ‘मकरत’ म्हणून साजरा केला जातो, जेव्हा लोक विशेष अशी खिचडी (मसूर-तांदूळ, फुलकोबी, वाटाणे आणि बटाटे अशा प्रकारे केली जाते) बनवतात , जी चोखा (भाजलेल्या भाज्या ), पापड, तूप आणि लोणच्यासोबत खाल्ली जाते.
आसाम हे राज्य त्याच्या उत्तर-पश्चिम भागातल्या निसर्गसौंदर्य भागासाठी प्रसिद्ध आहे. मकर संक्रांत इथे विविध प्रकारची मेजवानी आणि शेकोटी करून साजरी केली जाते. इथे ह्याला माघ बिहू असे म्हणतात. इथे लोकं या २-३ दिवसांसाठी शेतात घरं बनवतात. इथे मेजवानी आणि शेकोटीचा मनमुराद आनंद घेतात. ह्या घरांना मेजी किंवा भेलाघर असे म्हणतात. या दिवसात इथे गावरान पद्धतीचे खेळ खेळले जातात ज्याला तेकेली भोंगा असे म्हणतात.
तामिळनाडू मध्ये ४ दिवसाचा पोंगल अतिशय दिमाखात साजरा केला जातो. पहिला दिवस भोगी मानला जातो ज्यामध्ये जुने कपडे आणि वस्तू लोक होळीसारखे शेकोटीमध्ये नष्ट करतात. दुसरा दिवस थाई पोंगल म्हणून साजरा केला जातो जेव्हा पोंगल हा गोड़ पदार्थ बनवतात. हा पदार्थ भात, दूध, गूळ, ड्रायफ्रुटस यातून बनवला जातो.
पंजाबमध्ये सुद्धा मकर संक्रांत माघी म्हणून साजरी करतात. या दिवशी पहाटे नदीत स्नान करतात आणि संपूर्ण घरात तिळाच्या तेलाने दिवे लावतात. शीख इतिहासातील एका ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून माघी रोजी श्री मुक्तसर साहिब येथे एक मोठी जत्रा आयोजित केली जाते. भांगडा आणि गिड्डा सादर केला जातो, त्यानंतर सर्वजण एकत्र खिचडी, आणि गुळाची खीर खातात. संक्रांतीच्या किंवा माघीच्या आदल्या रात्री लोहरी साजरी केली जाते. माघीच्या दुसऱ्या दिवसापासून शेतकऱ्यांचे आर्थिक वर्ष सुरू होते.
मकर संक्रांत केवळ भारतातच नव्हे तर नेपाळ, इंडोनेशिया यासारख्या देशात देखील साजरी केली जाते. सलग ३ दिवस साजरा केला जाणारा हा सण वैज्ञानिक आणि आहारशास्त्राच्या दृष्टीनेदेखील अत्यंत महत्वाचा आहे. वैज्ञानिक भाषेत सूर्याचे दक्षिणायन पूर्ण होऊन उत्तरायण सुरु होते आणि हेच परिभ्रमण मकर संक्रांत म्हणून साजरे केले जाते. मकर संक्रांत हा सण पतंगबाजी आणि नैसर्गिक दृष्ट्या विशेष आहेच परंतु सांस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्रातही फार विशेष महत्त्व आहे. सूर्याच्या उत्तराणयात रथसप्तमी पर्यंत हळदी-कुंकू समारंभ साजरा केला जातो. नवं-विवाहित दाम्पत्यांसाठी हा सण विशेष पद्धतीने साजरा केला जातो. त्यांना हलव्याचे दागिने, काळे कपडे अशा काही वस्तू भेट दिल्या जातात. लहान बाळांना देखील हलव्याच्या दागिन्यांनी सजवले जाते. संक्रांतीचा शेवटचा दिवस हा किंक्रांतीचा असतो. या दिवशी संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले अशी अख्यायिका आहे. त्यामुळे हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो.
भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसात शेती आणि मळ्यांत आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. मकर संक्रांती अशा काळात येते, जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक मका, ऊस, शेंगदाणे, उडीद घरी घेऊन येतात. शेतकऱ्यांचे आणि पर्यायाने आपले घर अन्नधान्याने, समृद्धीने भरून जाते. एकूणच देशभरात सर्वच ठिकाणी हा सण अतिशय सकारात्मक पद्धतीने आणि मनाने साजरा केला जातो. वाईटावर सत्याचा विजय, नव्याची सुरुवात, संक्रमणाचा जल्लोष, कृषी संस्कृतीतील समर्पण भाव याच अर्थाने हा सण साजरा केला जातो. आपणही म्हणूया तिळगुळ घ्या, गोड़ बोला….!